महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
पणजी महापालिका आणि सरकारने संपावर असलेल्या महापालिकेच्या कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या एका महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला संप काल कामगारांनी मागे घेतला. आज सुट्टीचा दिवस असूनही कामगार काम करणार असल्याचे कामगार नेते अजितसिंग राणे यांनी सांगितले.ऍड. राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांची भेट घेतल्यानंतर कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला. परवा मंगळवारी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचीही संघटनेने भेट घेतली होती. ३३३ कामगारांना सेवेत नियमित करणे तसेच प्रतीदिनी वेतन २२१ वरून ४९९ रुपये करण्याच्या निर्णयावर एका महिन्यात निर्णय होणार असल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले.
कामगारांना बडतर्फ करण्याचा निर्णय मागे घेण्याचे ठरविले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. गेले दहा दिवस कामगार संपावर असल्याने शहरातील कचरा उचलण्याच्या प्रश्नावर गंभीर समस्या निर्माण झाली होती. कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी सांताक्रुझचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
संपाच्या काळातील वेतन कामगारांना मिळणार नाही, असे महापौरांनी एका प्रश्नावर सांगितले. नव वर्षाच्या काळात महापालिका क्षेत्रात कचर्याचे प्रमाण वाढते. कामगारांचा संप मिटला नसता तर प्रचंड पेच निर्माण झाला असता.