मनपा कक्षेतील मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू

0
61

>> कर प्रक्रियेत सुधारणा करण्याचा उद्देश

स्मार्ट मिशन व अमृत योजनेखाली हाती घेतलेले अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून स्मार्ट मिशनखाली आता पणजी महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण करण्याचे काम चालू केले आहे. मालमत्ता कर गोळा करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या हेतूनेच वरील सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे, असे इडीसीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सिध्दार्थ कुंकळकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
पालिका क्षेत्रातील काही मालमत्तेपासून कर गोळा होत नाही. त्यामुळे शंभरटक्के कर गोळा व्हावा व महापालिकेच्या महसुलात वाढ व्हावी हा सर्वेक्षण करण्यामागचा हेतू आहे. पणजी शहरात लावण्यात आलेल्या व भविष्य काळात लावण्यात येणार्‍या जाहिरातींच्या करातही सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे जीआयएस धर्तीवर शहरासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम मिशनतर्फे चालू असल्याचे कुंकळकर यांनी सांगितले.
शहरी भागाची सुधारणा करण्यासाठी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने १६ राज्यांना प्रोत्साहन म्हणून मदत दिली आहे. गोव्याचा क्रमांक अकरावा लागतो, असे त्यांनी सांगितले. पणजी शहराच्या विकासाच्याबाबतीत अभ्यास व सर्वेक्षण करताना वेगवेगळे ७९ निकष लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत मिशनखाली अनेक प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. त्यात रायबंदर येथील सामाजिक सभागृह, बस थांबा, मच्छिमारी जेटी यांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेस महापालिकेचे आयुक्त दीपक देसाई व अन्य अधिकारी उपस्थित होते.