मध्य प्रदेश, छत्तीसगडचे मुख्यमंत्री शपथबद्ध

0
22

>> मोहन यादव यांनी भोपाळमध्ये तर विष्णूदेव साई यांनी रायपूरमध्ये घेतली शपथ

काल मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ मोहन यादव यांनी तर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची विष्णूदेव साई यांनी शपथ घेतली. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील परेड ग्राउंडवर सकाळी 11.30 वाजता मोहन यादव यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रायपूरमध्ये विष्णुदेव साय यांनी हिंदीतून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मध्य प्रदेशात ‘मोहन’राज!
मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. खासदार राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल यांनी उज्जैन दक्षिणचे आमदार मोहन यादव यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासोबत जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भोपाळमध्ये हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या शानदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने 163 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसच्या 66 जागा कमी झाल्या. सोमवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. मोहन यादव ओबीसी समाजाचे नेते आहेत. मोहन यादव 2013 मध्ये प्रथमच उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

19 वे मुख्यमंत्री
मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव हे मध्य प्रदेशचे 19 वे मुख्यमंत्री आहेत. सध्या इतर कोणत्याही आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली नाही. मोहन यादव यांनी यावेळी, मी सर्वांना बरोबर घेऊन सुशासनाची खात्री देईन असे सांगितले.

रायपूरमध्ये साईंनी घेतली हिंदीतून शपथ
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची रायपूरमध्ये विष्णुदेव साई यांनी हिंदीत शपथ घेतली. राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनी त्यांना शपथ दिली. त्यांच्यानंतर अरुण साव आणि विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सायन्स कॉलेज ग्राउंड या कार्यक्रमाच्या मंचावर पंतप्रधान मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहाही रायपूरला उपस्थित होते. यावेळी स्थानिक कलाकारांनी सायन्स कॉलेजच्या मैदानात पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य सादर केले.

नवी टीम मोदींची गॅरंटी
पूर्ण करेल ः डॉ. सावंत
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमध्ये भाजप सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. मी छत्तीसगडमधील कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री आणि त्यांची संपूर्ण टीम मोदींची गॅरंटी पूर्ण करेल, हे मी निश्चितपणे सांगू शकतो असा विश्वास व्यक्त केला.