>> ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांची गोवा खंडपीठात माहिती; ग्रंथालयाच्या क्युरेटरला प्रतिज्ञापत्र सादरीकरणाचे निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या क्युरेटरला मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वातानुकूलित यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामाच्या प्रगतीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश काल दिले. याशिवाय गोवा राज्य ग्रंथालय परिषद आणि गोवा राज्य ग्रंथालय विकास कक्षाच्या स्थापनेच्या कार्यवाहीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. कालच्या सुनावणीदरम्यान, ग्रंथालयाच्या वातानुकूलित यंत्रणेच्या (एसी) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, येत्या मार्च 2024 पर्यंत ते काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्यायालयाला दिली.
उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील वातानुकूलित यंत्रणेच्या बिघाड व इतर प्रश्नांबाबत स्वेच्छा दखल घेतली आहे. न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझीस यांच्या खंडपीठासमोर या स्वेच्छा दखल याचिकेवर काल सुनावणी झाली. न्यायालयाने या याचिकेसाठी ॲमिकस क्युरी म्हणून ईशान ऊसपकर यांची नियुक्ती केली आहे.
मध्यवर्ती ग्रंथालयाने ॲमिकस क्युरीने सादर केलेल्या सूचना विचारात घेतल्या पाहिजेत. न्यायालयाकडून मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वातानुकूलित यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामकाजावर देखरेख ठेवली जात असून, त्याबाबत कंत्राटदाराला माहिती दिली पाहिजे. निर्धारित मुदतीत वातानुकूलित यंत्रणेचे काम पूर्ण करण्यावर भर देण्याची सूचना न्यायालयाने केली.
ॲमिकस क्युरीने दिलेल्या सूचनांवर विचारविनिमय केला जाणार असून पुढील सुनावणीच्या वेळी त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वातानुकूलित यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, येत्या 90 दिवसांत काम पूर्ण होणार आहे. येत्या मार्च 2024 पर्यंत वातानुकूलित यंत्रणा दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती देविदास पांगम यांनी न्यायालयाला दिली.
मध्यवर्ती ग्रंथालयातील जुनी, दुर्मिळ पुस्तके आणि दस्तऐवजांच्या डिजिटलायझेशनचे काम सुरू आहे. डिजिटलायझेशनच्या कामासाठी वेगळा विभाग सुरू करण्यात आला आहे. जुन्या, दुर्मिळ पुस्तकांच्या सुमारे 2 लाख 43 हजार 834 पानांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. जुन्या आणि दुर्मिळ पुस्तके आणि दस्तऐवजाच्या मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेन करण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी गोवा माहिती तंत्रज्ञान महामंडळाला (आयटीजी) नेमले जाणार आहे, अशी माहिती ॲड. पांगम यांनी दिली.
मध्यवर्ती ग्रंथालयातील पुस्तके, दस्तऐवज सुस्थितीत
गोवा राज्य ग्रंथालय परिषद आणि गोवा राज्य ग्रंथालय विकास कक्षाची स्थापना केली जाणार आहे. त्याबाबतची आवश्यक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मध्यवर्ती ग्रंथालयाबाबत क्युरेटरनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने आत्तापर्यंत पुस्तके किंवा इतर दस्तऐवज खराब झालेला नाही, असेही ॲड. देविदास पांगम यांनी न्यायालयाला सांगितले.