मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये आज मतदान

0
10

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, एकाच टप्प्यात 230 जागांवर मतदान होईल. छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदानही शुक्रवारी होणार असून, उर्वरित 70 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे.

मध्यप्रदेशमध्ये मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील 230 जागांसाठी 2533 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि विरोधी पक्षनेते कमलनाथ यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मध्यप्रदेशमध्ये ज्या 230 जागांवर मतदान होणार आहेत, त्या ठिकाणी 2,280 पुरुष, 252 महिला आणि एका तृतीयपंथीयासमवेत 2533 उमेदवार आपले भवितव्य आजमावणार आहेत. तब्बल 5 कोटी 60 लाख 58 हजार 521 मतदार 64 हजार 626 मतदान केंद्रावर मतदान करतील.
भाजप आणि काँग्रेसने 230 जागांवरही उमेदवार उभे केले आहेत. बसपने 181, सपाने 71 आणि आपने 66 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

छत्तीसगढमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान

छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला 20 जागांवर मतदान झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव या राज्यात दोन टप्प्यात मतदान होत आहे. शुक्रवारी उर्वरित 70 जागांवर मतदान होणार असून, जवळपास दीड कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. या 70 जागांसाठी एकूण 958 उमेदवार रिंगणात असतील.