मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचेसरकार अस्थिर असून कॉंग्रेसचे १५ ते २० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. तर आता डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतलेल्या कॉंग्रेसने कमलनाथ सरकार स्थिर असल्याचा दावा केला आहे. आमदारांची कामे होत नसल्यामुळे ते नाराज असल्याचा दावा मिश्रा यांनी केला.
मध्यप्रदेशात मंगळवारी रात्री झालेल्या राजकीय घडामोडीत १० आमदार कमलनाथ सरकारमधून बाहेर पडल्याचा दावा केला गेला. भाजपने काही कॉंग्रेसचे आणि अपक्ष आमदारांचे बळजबरीने दिल्लीचे विमान बुक केले, असा आरोप कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला. मात्र दिल्लीला गेलेले कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी घर वापसी केली असल्यामुळे या सरकारला कुठलाही धोका नाही, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला.
काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेस आमदारांची कामे होत नाहीत. यामुळे ते राज्य सरकारवर नाराज आहेत. जवळपास १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे श्री. मिश्रा यांनी केला आहे. ज्या १० आमादारांची चर्चा सुरू आहे त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तर भाजपची संख्या ११७ होते. विधानसभेत बहुमतासाठी ११६ आमदारांची गरज आहे. म्हणजे भाजप बहुमत सिद्ध करू शकते. यामुळे मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार कोसळू शकते असा दावाही यावेळी त्यांनी केला.
दरम्यान, आतापर्यंत आपण विधानसभेत तीन वेळा बहुमत सिद्ध केलेले आहे. मध्यप्रदेशात भाजप कॉंग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांना अपयश येत आहे. आमहाला पूर्ण बहुमत आहे. त्यामुळेच आम्ही अर्थसंकल्पही मंजूर केल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.