मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांचे कॉंग्रेसचे सरकार अखेर कोसळले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याचा शेवट काल झाला. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी होण्याआधीच आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. दुपारी १ वाजता राज्यपालांची भेट घेऊन आपण राजीनामा सोपवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मी कधीही सौदेबाजीचं राजकारण केलं नाही. मी नेहमी स्वच्छ राजकारण केलं. भाजपने मध्य प्रदेशातील जनतेसोबत विश्वासघात केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेश सरकार अस्थिर झालो होते. त्यामुळे काल शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार होते. मात्र त्याआधीच कमलनाथ यांनी राजीनामा दिला.
दि. १० मार्च रोजी ज्योतिरादित्य शिंदेच्या गटातील २२ कॉंग्रेस आमदार बेंगळुरूला गेले आणि त्यांनी आपले राजीनामे पाठवून दिले. विधानसभा अध्यक्षांनी ६ मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले मात्र उर्वरित १६ आमदारांच्या राजीनाम्यांवर निर्णय घेतला नाही. यानंतर प्रथम भाजपने राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी केली. राज्यपालांनी तसे आदेशही दिले. मात्र मुख्यमंत्री कमलनाथांनी ते मान्य केले नाही. त्यानंतर भाजप नेते शिवराजसिंह चौहान सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यावेळी न्यायालयाने बहुमत चाचणीचे आदेश दिले. त्यानंतर १९ मार्चच्या रात्री विधानसभा अध्यक्षांनी उर्वरित १६ आमदारांचे राजीनामे स्वीकारले. २० मार्चला दुपारी कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.