मद्य धोरण घोटाळा प्रकरणी खासदार संजय सिंह अटकेत

0
5

सक्तवसुली संचालनालयाने काल सकाळी 7 च्या सुमारास आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापेमारी केली. दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी हा छापा टाकण्यात आला होता. या छापेमारीनंतर सलग 10 तास संजय सिंह यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून काही कागदपत्रे ईडीने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यापूर्वी याचप्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती, ते सध्या तुरुंगात आहेत.

ईडी सध्या मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. या प्रकरणी ईडीने अलीकडेच आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात खासदार संजय सिंह यांचेही नाव आहे.
सलग 10 तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय सिंह यांना अटक केली. त्याआधी चौकशी सुरू असताना आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने संजय सिंह यांच्या घराबाहेर जमू लागले होते. त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यानंतर सिंह यांच्या घराच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आले. पोलीस आणि निमलष्करी दलाच्या सहाय्याने ईडीने संजय सिंह यांना अटक केली.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संजय सिंह यांच्या नावाचा ईडीने आपल्या तक्रारपत्रात समावेश केला होता.