मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांची चौकशी होणार

0
9

16 एप्रिलला चौकशीस हजर राहण्याचे सीबीआयचे समन्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आधीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे आता दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी गरम होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांची रविवार दि. 16 एप्रिल रोजी चौकशी होणार आहे.

नेमके प्रकरण काय?
2020-21 मध्ये दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता. काही ठराविक कंत्राटदारांनाच त्यात फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे. संबंधित योग्य त्या विभागाच्या संमती न घेताच लायसन्स फीमध्ये सवलत दिल्याचाही आरोप आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा देणारे निर्णय पक्षपातीपणे घेतल्याचा आरोप आप सरकारवर आहे. दरम्यान, सीबीआय समन्सवर आपचे खासदार संजय सिंह यांनी ट्विट करून टीका केली. अत्याचाराचा अंत नक्कीच होणार असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.