मद्याच्या तस्करी प्रकरणी तेलंगणात कदंब बसचालक, वाहकाला अटक

0
11

तेलंगणा सरकारच्या अबकारी विभागाने गोवा कदंब महामंडळाच्या बसमधून होणारी गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी उघडकीस आणली. कदंब बसमधून सुमारे 1 लाख रुपयांचे मद्य जप्त केले असून, बसचालक आणि वाहकाला अटक केली. ही कारवाई रविवारी करण्यात आली, अशी माहिती मद्य प्रतिबंध आणि उत्पादन शुल्क अंमलबजावणी विभागाचे साहाय्यक आयुक्त के. रघुराम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, या प्रकरणानंतर बसचालक आणि वाहकाला निलंबित करण्यात आले आहे.

गोवा कदंब महामंडळाची प्रवासी बस (क्र. जीए-03-एक्स-0478) हैदराबादला जात असताना वाटेत मेडक येथील (तेलंगणा) अबकारी खात्याच्या पथकाने कामकोले टोल प्लाझाजवळ कदंब बसची झडती घेतली. यावेळी बसमध्ये विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या 70 मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. या मद्याची बाजारातील किंमत 1 लाख रुपये इतकी आहे. अबकारी विभागाने बसचालक उल्हास श्रीधर (52) आणि आबासाहेब व्ही. (51) यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. गोव्याहून हैदराबादला निघालेल्या जीए-03-एक्स-0478 या क्रमांकाच्या कदंब परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्याची तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली होती.

तेलंगणातील मद्याच्या दरांपेक्षा गोव्यातील मद्याचे दर खूपच कमी आहेत. दोन्ही संशयितांनी मद्य तस्करीची कबुली दिली असून, या दोघांचा मद्याच्या बाटल्या तेलंगणामध्ये वाढीव दराने विकण्याचा विचार होता, असे रघुराम यांनी म्हटले आहे.

गोव्यातून तेलंगणात अमलीपदार्थांचीही तस्करी
गोव्यातून अमलीपदार्थाची तेलंगणामध्ये तस्करी केली जात आहे. तेलंगणा पोलिसांनी उत्तर गोव्यातील किनारी भागातील काही हॉटेलमालकांना अमलीपदार्थविरोधी प्रकरणांमध्ये अटक केली आहे. आता, तेलंगणा अबकारी विभागाने मद्य तस्करी उघडकीस आणली आहे. यापूर्वी खासगी वाहनातून मद्य तस्करीचे अनेक प्रकार उजेडात आले होते. आता, सरकारी कदंब बसमधून होणारी मद्य तस्करी समोर आली आहे.