मद्यधुंद कारचालकाने ठोकरल्याने ९ दुचाक्या व कारचे नुकसान

0
84
अपघातग्रस्त मारुती वॅगनर. (छाया : प्रदीप नाईक)

जेटी-सडा येथील अपघात
गुलालोत्सवाच्या कार्यक्रमात मद्यधुंद होऊन सुसाट वेगाने जाणार्‍या एका वॅगनर चालकाने काल मध्यरात्री जेटी-सडा येथे १२ वाजण्याच्या सुमारास एकाचवेळी ९ दुचाक्या तसेच कारला ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने सदर सुसाट कार वाहनांना धडक दिल्यानंतर एका झाडावर जाऊन स्थिरावल्याने मुरगाव बंदरातील खोल दरीत कोसळण्यापासून वाचल्याने मद्यधुंद चालक गणेश नार्वेकर किरकोळ जखमांवर आश्‍चर्यकारकरीत्या बचावला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाल उधळून मद्यधुंदीत गणेश नार्वेकर काल मध्यरात्री १२ च्या सुमारास जीए- ०६- डी- ४७२२ या क्रमांकाच्या मारुती वॅगनरने सुसाट वेगाने आपल्या घरी परतत असताना वाहनांवरील ताबा सुटल्याने कारने जेटी येथील रेडकर हाउसच्या समोरील एकूण ९ दुचाक्या तसेच टाटा मांझा या कारला जोरदार ठोकर दिली. सदर धडक एवढी जबरदस्त होती की त्या आवाजाने परिसरातील लोक खडबडून जागे होऊन घराबाहेर आले. या अपघातात सुशांत रेडकर, रत्नमाला रेडकर, चंदन कासकर, विग्नेश रेडकर, राजू रेडकर, नीलेश रेडकर, इम्तियाज हुल्ली आणि आलीम हुल्ली यांच्या मालकीच्या दुचाक्या आणि वैभव रेडकर यांची कारचे नुकसान झाले. बहुतेक वाहनांना मागून धडक बसली तर दोन दुचाक्यांचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती नागरिकांनी रात्रीच मुरगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी, मद्यधुंद चालक गणेशला नागरिकांनी गाडीबाहेर काढून तो मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने त्याला बराच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, पोलिसांनी चालक गणेश नार्वेकर याच्यावर दारूच्या नशेत वाहन चालविल्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंदविला आहे.