आगामी शैक्षणिक वर्षापासून मत्स्य व्यवसायात बीएस्सी (बॅचलर इन फिशरिज सायन्स) हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मत्स्य महोत्सवाच्या जागृती व्हॅनचा शुभारंभ केल्यानंतर पर्वरी येथे काल दिली. सातवा महोत्सव येत्या 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यातील तरुणांनी मत्स्य उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. खाण, पर्यटन, मच्छिमारी हे राज्यातील मुख्य व्यवसाय आहेत. या व्यवसायांमध्ये गोमंतकीयांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. राज्यातील मच्छिमारी व्यवसायातील कामगार तर बहुतांशी परप्रांतीयच आहेत. या व्यवसायात गोमंतकीय तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मच्छिमारी व्यवसायातील सविस्तर माहिती स्थानिक तरुणांना देण्यासाठी अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. मत्स्य क्षेत्रात गोव्याची वार्षिक उलाढाल 1,000 कोटींहून अधिक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हर्ळणकर यांची उपस्थिती होती.