मत्स्योद्योग खात्याकडे मासळी व्यापारी म्हणून नोंदणी बंधनकारक करण्याचा विचार

0
8

>> मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे सुतोवाच

मासळीचा व्यापार करणार्‍या सर्व व्यापार्‍यांना मत्स्योद्योग खात्याकडे व्यापारी म्हणून नोंदणी करणे बंधनकारक करण्याबाबत खाते विचार करीत असल्याचे मत्स्योद्योमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी काल सांगितले. एकदा ही नोंदणी करणे बंधनकारक झाले की, ज्यांनी खात्याकडे नोंदणी केली आहे, त्याच मच्छिमारांना जेटीवर प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मांडवी मच्छिमार सहकार सोसायटी ही अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. या सोसायटीतील काही सदस्यांची दादागिरी चालू असून, ते एक बोटमालक गौरीश साळगावकर यांना असहकार्य करून त्यांचे नुकसान करीत आहेत. सदर सदस्य अन्य व्यापार्‍यांना साळगावकर यांच्या बोटीतील मासळी खरेदी करू देत नसून, त्यामुळे मालिम जेटीवर त्यांची जवळपास दीड टन मासळी कुजून वाया जाण्याचा प्रकार घडला, असे हळर्णकर यांनी सांगितले.

गौरीश साळगावकर यांना पूर्ण सहकार्य करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मांडवी मच्छिमारी सहकारी सोसायटीला दिला होता. असे असतानाही सोसायटीने त्यांची मासळी कुणीही खरेदी करू नये, यासाठी हरएक प्रकारे प्रयत्न केला व परिणामी मालीम जेटीवर त्यांची दीड टन मासळी कुजून गेली. हे सर्व सहन करण्यापलिकडचे आहे, असेही हळर्णकर म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर मच्छिमारी खात्याकडे मासळी व्यापारी म्हणून नोंद न करणार्‍या व्यापार्‍यांना राज्यभरातील कुठल्याही मासळी जेटीवर प्रवेश करू दिला जाणार नसल्याचे हळर्णकर यांनी स्पष्ट केले.