मत्स्यवाहिनी योजनेचा आज शुभारंभ

0
10

>> राज्यातील मत्स्यप्रेमींना स्वस्तदरात मिळणार मासळी

>> 50 ई-रिक्षांद्वारे राज्यात होणार मासे विक्री

राज्यातील ग्राहकांना स्वस्त दरात मासळी उपलब्ध करून देण्यासाठीच्या मत्स्यवाहिनी योजनेचा आज सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती काल मच्छीमारी खात्याच्या संचालक डॉ. शामिला मोंतेरो यांनी दिली. या योजनेसाठी विजेवर चालणाऱ्या 50 रिक्षांचा वापर करण्यात येणार असून या 50 रिक्षाही स्वस्त दरातील मासळी विकण्यासाठी गोवाभर फिरणार असल्याची माहिती डॉ. मोंतेरो यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली. आज नारळी पौर्णिमेच्या शुभदिनी एका रिक्षेद्वारे या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी 10 ई-रिक्षा आणण्यात येणार असून त्या चालू महिन्याच्या शेवटी अथवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित 40 ई-रिक्षा ह्या चालू वर्षाच्या शेवटापर्यंत म्हणजेच नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात उपलब्ध होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

यापूर्वी मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना लोकांना स्वस्त दरात मासळी विक्री करण्यासाठी खास वाहने खरेदी करण्यात आली होती. आणि ही वाहने विविध भागांत फिरून लोकांना कमी दरात मासळीची विक्री करत असत. पण नंतर ही योजना बंद झाली. मात्र, ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी अशी लोकांची वाढती मागणी होती आणि ती लक्षात घेऊन काही आमदारांनी विधानसभा अधिवेशनातूनही ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मच्छीमारी खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी ही योजना परत नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. मोंतेरो
म्हणाल्या.

आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी या योजनेचा शुभारंभ होत असून एका ई-रिक्षा गाडीला आज हिरवा कंदील दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मात्र, तसे असले तरी चालू महिन्याच्या शेवटी अथवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 10 ई-रिक्षा उपलब्ध झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या मत्स्यवाहिनी योजनेचा शुभारंभ होणार असल्याचे डॉ. मोंतेरो म्हणाल्या. नंतर वर्षाच्या शेवटी आणि 40 ई-रिक्षा उपलब्ध झाल्यानंतर ही योजना राज्यभरात चालू होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

आज नारळी पौर्णिमेपासून मासळीमारीला वेग येणार

राज्यात 1 ऑगस्टपासून मच्छीमारी मोसम सुरू झालेला असला तरी आज नारळी पौर्णिमेपासून राज्यात खऱ्या अर्थाने मच्छीमारी सुरू होणार असल्याचे डॉ. शामिला मोंतेरो यांनी सांगितले. राज्यातील मच्छीमारी बोटींवर काम करणारे जास्तीत जास्त मच्छीमार आज नारळी पौर्णिमेपासून कामावर रुजू होणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे आजपासून जास्तीत जास्त मच्छीमारी ट्रॉलर्स व अन्य बोटी मच्छीमारीसाठी समुद्रात उतरणार असल्याची माहिती डॉ. मोंतेरो यांनी दिली. त्यामुळे आता बाजारात मोठ्या संख्येने मासळी उपलब्ध होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

जनतेच्या मागणीनुसार योजना

मासळीचे दर राज्यात वाढल्याने स्वस्त दरात मासळी विक्रीची सोय सरकारने करावी, अशी जनतेची मागणी होती आणि विधानसभेतूनही काही आमदारांनी तशी मागणी केली होती, असे डॉ. मोंतेरो म्हणाल्या.