>> पी. चिदंबरम्, दिनेश गुंडूराव दाखल
>> फडणवीस, सी. टी. राव आज, उद्या येणार
येत्या १० मार्च रोजी गोवा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून त्यासाठीची रणनीती सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेते राज्यात दाखल होत आहेत. कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् व गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांचे काल रविवारी गोव्यात आगमन झाले. तर भाजपचे निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस व भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. राव हे आज सोमवारी किंवा उद्या मंगळवारी राज्यात दाखल होणार आहेत.
२०१७ साली झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला १७ जागा मिळाल्या होत्या आणि कॉंग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. पण त्यावेळी मुख्यमंत्रिपदावरून एकमत होऊ न शकल्याने पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यास विलंब झाला होता. आणि त्याचा लाभ उठवत राज्यात भाजपने सरकार स्थापन केले होते.
त्यावेळसारखी स्थिती पुन्हा होऊ नये यासाठी आता कॉंग्रेस पक्षाने झटपट पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला असून शनिवारी नवी दिल्लीत पक्षनेते राहुल गांधी यांच्याबरोबर झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाने काल रविवारी पी. चिदंबरम् व दिनेश गुंडूराव यांना ताबडतोब गोव्यात पाठवण्याची सोय केली. मतमोजणी पूर्ण होऊन सरकार स्थापन होईपर्यंत हे दोन्ही दिग्गज नेते राज्यात तळ ठोकून राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कॉंग्रेस नेते पुढील व्युहरचना तयार करणार आहेत.
कॉंग्रेस व भाजप ह्या दोन्ही प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असून दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेसाठीची संधी आपल्या हातून जाऊ द्यायची नसल्याने मगो, आम आदमी पक्ष, तृणमूल कॉंग्रेससह ज्या ज्या अन्य छोट्या पक्षांचे तसेच जे अपक्ष आमदार निवडून येतील त्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी कॉंग्रेस व भाजप ह्या दोन्ही पक्षात तीव्र स्पर्धा निर्माण होणार आहे.
मुख्यमंत्रिपदासाठीही स्पर्धा
अशातच भाजप व कॉंग्रेस ह्या दोन्ही पक्षांतील काही अतिमहत्त्वाकांक्षी नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा रंगणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. आपले पाच-सहा उमेदवार निवडून आल्यास व भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांना स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मगोचे नेते सुदिन ढवळीकर हेही मुख्यमंत्रिपदासाठीच्या स्पर्धेत उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ह्या पार्श्वभूमीवर भाजप व कॉंग्रेस ह्या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठीचा दावा राज्यापालांकडे करण्यापूर्वी आपला मुख्यमंत्री एकमताने ठरवण्याचे कठीण काम तडीस न्यावे लागणार आहे. भाजपमध्ये विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे मुख्यमंत्रिपदासाठीचे दावेदार आहेत. तर कॉंग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व मायकल लोबो हे मुख्यमंत्रिपदासाठीच्या शर्यतीत आहेत. तर कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यास आपली मुख्यमंत्रिपदावर वर्णी लावण्याची अट मगो नेते सुदिन ढवळीकर हे घालू शकतात असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
फडणवीस, सी. टी. रवी आज, उद्या दाखल होणार
राज्यातील विधानसभा निवडणुकीची येत्या १० रोजी मतमोजणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाची सरकार स्थापनेसंबंधीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांचे आज सोमवार दि. ७ रोजी अथवा उद्या मंगळवार दि. ८ मार्च रोजी गोव्यात आगमन होणार असल्याच माहिती भाजप नेते नरेंद्र सावईकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली.