निवडणुकीदरम्यान मतदारयाद्यांतील अनियमितता आणि बनावट मतदानाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने काल एक मोठा निर्णय घेतला. यापुढे बोगस मतदानाचा प्रश्न निकाली लागणार आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या काल एका उच्चस्तरीय बैठकीत आधार कार्डला मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आणि निवडणूक आयोगाचे तांत्रिक तज्ञ लवकरच या संदर्भात पुढील चर्चा करतील.
नवी दिल्ली येथील निर्वचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृह सचिव, कायदा विभागाचे सचिव, आणि सीईओ यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाचे तांत्रिक तज्ञ उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. संविधानाच्या अनुच्छेद 326 नुसार, मतदानाचा अधिकार केवळ भारताच्या नागरिकालाच प्रदान करण्यात आला आहे आणि आधार कार्ड त्या व्यक्तीची ओळख आहे. संविधानाच्या अनुच्छेद 326 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1950 च्या कलम 23(4), 23(5) आणि 23(6) च्या तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला. मतदार नोंदणी क्रमांकसोबत आधार क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तज्ज्ञांसोबत सल्लामसलत होईल. आधार कार्ड फक्त ओळख प्रस्थापित करणारी व्यवस्था आहे, त्याचा संबंध नागरिकत्वाशी नाही. मतदानाचा अधिकार फक्त नागरिकांनाच आहे.
का घेतला हा निर्णय?
सध्या अनेक ठिकाणी एकाच मतदाराची नावे वेगवेगळ्या ठिकाणी नोंद होण्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच, बोगस मतदार ओळखणे आणि बनावट मतदान रोखण्यासाठी सरकार आणि निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मतदार ओळखपत्र व आधार कार्ड लिंकिंगमुळे प्रत्येक मतदाराची ओळख निश्चित करता येईल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणता येईल.
अंमलबजावणी कधी आणि कशी?
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग लवकरच तज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात येतील. याबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील. मतदारांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी एक निश्चित कालावधी दिला जाईल, तसेच, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पार पडणार आहे.