दोन्ही मतदारसंघांत एकूण 1750 मतदान केंद्रे; 80 आदर्श मतदान केंद्रे
राज्यातील सरकारी यंत्रणा लोकसभेच्या येत्या 7 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी सज्ज होत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी वापरली जाणारी ईव्हीएम मशीन व इतर साहित्य स्ट्राँग रूममध्ये कडक सुरक्षेमध्ये ठेवण्यात आली आहेत. राज्यातील दोन्ही मतदारसंघांत एकूण 1750 मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांपैकी दोन्ही मतदारसंघातील सुमारे 80 आदर्श मतदान केंद्रे, हरित मतदान केंद्रे म्हणून तयार केली जाणार आहेत. तसेच, सुमारे 20 गुलाबी मतदान केंद्रे असतील. या मतदान केंद्रावर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावरील साधनसुविधांची पाहणी केली जात आहे. तसेच, केंद्रीय निरीक्षकांकडून सुध्दा मतदान निवडक केंद्राने भेट देऊन पाहणी केली जात आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून मतदान केंद्रांना भेटी देऊन साधनसुविधांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदान केंद्रावर मतदारांना पाणी, स्वच्छतागृह आदी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
दोन्ही मतदारसंघांत निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 5 मे रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून जमावबंदीचा आदेश लागू केला जाणार असून, तो 7 मेपर्यंत कायम राहणार आहे.
राज्यातील जाहीर प्रचाराची सांगता 5 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता झाल्यानंतर जमावबंदीचा आदेश लागू होणार आहे. यासंबंधीची सूचना उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली आहे. जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरणारी प्रचार वाहने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. निवडणुकीच्या काळात पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. सरकारी यंत्रणेकडून 5 मे रोजी संध्याकाळपासून राज्यभरात फिरणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाची तपासणी केली जाणार आहे. जमावबंदीच्या काळात रॅली, कोपरा सभा घेण्यास बंदी घातली आहे.
मुख्य निवडणूक कार्यालयाकडून राज्यातील लोकसभा निवडणूक मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध भागात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध माध्यमातून मतदानाबाबत जागृती केली जात आहे.
मद्यालये बंद ठेवण्याचे आदेश
लोकसभेच्या निवडणूकीमुळे 5 मे रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7 मे रोजी मध्यरात्रीपर्यंत आणि 4 जून रोजी मतमोजणीच्या दिवशी सर्व परवानाधारक मद्यालये बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. बार आणि रेस्टॉरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे.