>> केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय; प्रकरणाची सुनावणी मणिपूरबाहेर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार
गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून, काही दिवसांपूर्वी व्हायरल व्हिडिओतून मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर दोन-अडीच महिन्यांत मणिपूर पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत मोदी सरकारनेही मणिपूरमधील हिंसाचाराची दखल घेतली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावल्यानंतर या प्रकरणी कारवाईला सुरुवात झाली; मात्र या प्रकरणी तपासाची गती मंदच होती. अखेर आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने काल घेतला.
केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. यासोबतच केंद्र सरकार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल करणार आहे. यामध्ये गृह मंत्रालय व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची सुनावणी मणिपूरबाहेर करण्याची विनंती प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाला करणार आहे.
मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार 4 मे 2023 ला घडला होता; परंतु जुलै महिना अर्धा उलटला तरी याप्रकरणी पोलिसांनी कुठलीही मोठी कारवाई केली नव्हती. मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील दोन-अडीच महिने मौन बाळगले होते; मात्र सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी देखील याबाबत भाष्य केले होते. या विषयावरून संसदेतही विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, पंतप्रधानांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्याभरात या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
‘तो’ व्हिडिओ शूट करणाऱ्यास अटक
मणिपूरमधील महिलांचा व्हायरल व्हिडिओ ज्या मोबाईलवरून शूट करण्यात आला होता, तो फोन जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय, हा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
‘इंडिया’चे पथक उद्या मणिपूरला भेट देणार
विरोधी पक्षांची महाआघाडी ‘इंडिया’च्या खासदारांचे एक पथक येत्या 29 आणि 30 जुलै रोजी मणिपूरला भेट देणार आहे. यादरम्यान ते पीडितांची भेट घेतील. राहुल गांधींनी याआधीच मणिपूरला भेट दिली आहे.