पोलिसांनी अडवल्यानंतरही इच्छितस्थळी पोहाचले; 300 मदत छावण्यांमध्ये 65 हजार लोकांचे वास्तव्य
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल हिंसाचारग्रस्त मणिपूरचा दौरा केला. सुरुवातीला ते इंफाळ या ठिकाणी पोहचले. त्यानंतर ते चुराचांदपूर या ठिकाणी निघाले; मात्र त्यांचा ताफा हिंसाचाराच्या भीतीने विष्णुपूर येथे अडवण्यात आला. त्यानंतर राहुल गांधी हे हेलिकॉप्टरद्वारे मणिपूरमधील चुराचंदपूरला पोहोचले. या ठिकाणी त्यांनी मदत छावण्यांतील पीडितांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. त्यांनी तिथल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. या शिबिरादरम्यान त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत दुपारचे जेवण देखील केले. दरम्यान, शुक्रवारपर्यंत राहुल गांधी हे मणिपूरमध्येच असतील.
3 मेपासून मणिपूरमध्ये हिंसाचार भडकला असून, आतापर्यंत 131 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक विस्थापित झाले आहेत. या ठिकाणी 300 हून जास्त छावण्यांमध्ये 65 हजार लोक वास्तव्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर काल राहुल गांधींनी मणिपूरचा दौरा केला.
मणिपूर दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांचा ताफा विष्णुपूर या ठिकाणी अडवण्यात आला. इंफाळहून 20 किलोमीटर अंतरावरच राहुल गांधी आणि त्यांचा ताफा अडवण्यात आला. हिंसाचार सुरू असलेल्या मणिपूरच्या कंगपोकपी जिल्ह्यातल्या हरओठेल गावात गुरुवारी काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी राहुल गांधींना चुराचंदपूरपासून 34 किलोमीटर आधीच विष्णुपुर येथे रोखले. हिंसाचाराच्या भीताने पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरद्वारे जाण्याचा निर्णय घेतला. ते सरकारी हेलिकॉप्टरद्वारे चुराचंदपूरला पोहोचले. याठिकाणी त्यांनी मदत छावण्यांतील पीडितांची भेट घेतली.
राहुल गांधींना का अडवण्यात आले त्याचे स्पष्टीकरणही पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. विष्णुपूर जिल्ह्यात महामार्गावर टायर जाळण्यात आले आणि ताफ्यावर काही दगडफेकही झाली. अशा घटना पुन्हा घडण्याची भीती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राहुल गांधींचा ताफा विष्णुपूर येथे थांबवण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. हा ताफा अडवल्यानंतर एका गटाने त्यांच्या समर्थनार्थ तर एका गटाने त्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला.
दरम्यान, आपल्या समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा, अशी मागणी मैतेई समुदायाने करत मणिपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने मैतेईचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समावेश करण्याची राज्य सरकारला शिफारस केली. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायाच्या दरम्यान हिंसा सुरू झाली. या हिंसाचारात आतापर्यंत 131 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 419 जण जखमी झाले आहेत. 65,000 हून अधिक लोकांनी घरे सोडली आहेत. जाळपोळीच्या 5 हजारांहून अधिक घटना घडल्या आहेत. सहा हजार गुन्हे दाखल करण्यात आले असून, 144 जणांना अटक करण्यात आली आहे.