‘मणिपूर’वर चर्चेस नकार; विरोधकांचा सभात्याग

0
55

>> विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा खासगी ठराव सभापतींनी फेटाळला; विरोधकांचा तीन वेळा सभागृहात गदारोळ

मणिपूरमधील हिंसाचारासंबंधीचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा खासगी ठराव काल चर्चेसाठी घेण्यास सभापती रमेश तवडकर यांनी नकार देत सदर ठराव फेटाळला. या ठरावावर चर्चा व्हावी, यासाठी सर्व सातही आमदारांनी सकाळच्या सत्रात दोनवेळा सभागृहात गदारोळ माजवला. दुपारनंतरच्या सत्रातही विरोधी आमदारांनी या ठरावावर चर्चेची मागणी लावून धरत गदारोळ केला; मात्र तरीही मागणी सभापतींनी मान्य न केल्याने अखेर पाच विरोधी आमदारांनी सभात्याग केला.

काल सुरुवातीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली सर्व सातही आमदारांनी या प्रश्नावरून दोनदा सभागृहात गदारोळ माजवत सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. काल सभागृहाचे कामकाज सुरू होताच युरी आलेमाव सभापतींना म्हणाले, की गेल्या शुक्रवारी खासगी ठरावांच्या दिवशी आपण हा ठराव चर्चेस घेतला नव्हता. त्यामुळे तो आज चर्चेसाठी घ्यावा. त्यावर सभापतींनी यासंबंधी तुम्हाला काय सांगायचे आहे ते शून्य तासाच्या वेळी सांगावे, असे सांगून विरोधकांची समजूत काढली.

शून्य प्रहराला पुन्हा गदारोळ
त्यानंतर विरोधकांनी शून्य तासाला पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा सभापतींनी हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असून आपण तो चर्चेस घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, विजय सरदेसाई, व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा व वीरेश बोरकर या विरोधी आमदारांनी पुन्हा एकदा सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन गदारोळ माजवला. मात्र, सभापतींनी सदर ठराव फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट केले.

आलेमाव यांच्या विधानाला मुख्यमंत्र्यांचा आक्षेप
यावेळी युरी आलेमाव यांनी मणिपूरमध्ये जे काही घडलेले आहे, ते गोव्यातही घडू शकते, असे सांगताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्या विधानाला आक्षेप घेतला आणि युरी आलेमाव हे काहीच्या काही बोलत असल्याचा आरोप केला. या गदारोळातच सभापतींनी आपण सदर ठराव फेटाळत असल्याचा आदेश दिल्याने विरोधकांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली.

दुपारनंतरच्या सत्रात पुन्हा
विरोधकांकडून चर्चेची मागणी

सभापतींनी मणिपूरवर चर्चेची मागणी फेटाळल्यानंतरही दुपारी 2.30 वाजता विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधी आमदारांनी मणिपूर संदर्भातील ठरावावर चर्चेची मागणी लावून धरली. सभापतींनी या ठरावावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिल्याने विरोधी आमदारांनी सभापतींच्या आसनासमोरील हौदात धाव घेतली. सभापतींनी त्यांना जागेवर बसण्याची वारंवार सूचना केली; मात्र त्यांनी नकार दिला आणि मणिपूर ठरावावर चर्चेची मागणी लावून धरली.

अन्‌‍ विरोधकांनी सभागृह सोडले
सभापतींनी गदारोळातच सभागृहाचे कामकाज सुरू केल्याने अखेर विरोधी गटातील पाच आमदारांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले. सभात्याग करणाऱ्यांमध्ये युरी आलेमाव, व्हेन्झी व्हिएगश, क्रूझ सिल्वा, वीरेश बोरकर, एल्टन डिकॉस्टा यांचा समावेश होता. त्यानंतर या पाच आमदारांनी विधानसभा संकुलातील अशोक स्तंभाजवळ निदर्शने केली. विरोधी गटातील आमदार विजय सरदेसाई हे त्यांचा एक खासगी ठराव चर्चेला येणार असल्याने सभागृहातून बसून राहिले, तर कॉँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा हे सभागृहात उपस्थित नव्हते.

लोकांना चिथावण्याचा प्रयत्न नको
गोव्यात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. येथील एकोपा, शांतता भंग करण्याचा कुणी प्रयत्न करू नये. गोव्यात मणिपूरचा मुद्दा उपस्थित करून नागरिकांना चिथावणी देण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असेही सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.

मणिपूरचा विषय संवेदनशील : सभापती
मणिपूर हिंसाचाराचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे आपण तो चर्चेस घेऊ शकत नाही. गोवा सरकारने यासंबंधीची आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्रालय हा संवेदनशील प्रश्न योग्य प्रकारे हाताळत असून, त्यासंबंधी कारवाईही करीत आहे. या पार्श्वभूमीवर आपण हा ठराव फेटाळत असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी काल स्पष्ट केले.

…म्हणून आपण सभागृहाबाहेर गेलो नाही : सरदेसाई
मणिपूर ठरावाबाबत आपण विरोधी आमदारांच्या सोबत आहे. तथापि, विधानसभेत आपला ‘फिश करी अँड राईस’ हा प्राधान्यक्रम असलेला खासगी ठराव चर्चेला येणार असल्याने आपण सभागृहातून बाहेर गेलो नाही, असे स्पष्टीकरण आमदार विजय सरदेसाई यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिले.

अशा विषयांवर चर्चा नको : मुख्यमंत्री
मणिपूर येथील मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मणिपूरमधील परिस्थितीबाबत आम्हाला सहानुभूती आहे. गोव्यातील एका फादरने छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त विधान करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र नंतर त्या फादराने आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल अशा विषयावर चर्चा करणे अयोग्य आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.