गोवा विधानसभा सभागृहातील आपल्या निलंबनाचा काळ संपल्यानंतर काल शून्य प्रहराला विधानसभा सभागृहात आलेल्या सातही विरोधी आमदारांनी पुन्हा एकदा काल सभापती रमेश तवडकर यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत मणिपूर हिंसाचारावरील चर्चेच्या मागणीसाठी गदारोळ माजवला.
काल सभागृहात प्रवेश करताच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मणिपूरसंबंधीचा आपला ठराव चर्चेस घेण्याची मागणी केली; मात्र सभापती रमेश तवडकर यांनी मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर युरी आलेमाव व विजय सरदेसाई यांनी आपली मागणी लावून धरत सभापतींशी हुज्जत घातली. त्यामुळे काल शून्य प्रहराला सभागृहात कामकाज होऊ शकले नाही. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी या ठरावावर काय करायचे यासंबंधी सभापतींशी बंद खोलीत चर्चा करून निर्णय घेऊया, असे सुचवल्यानंतर विरोधी आमदार शांत झाले.
तत्पूर्वी काळ्या वेषात आलेल्या युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा या काँग्रेस आमदारांबरोबरच आपचे व्हेन्झी व्हिएगस व क्रुझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि रिव्होल्युशनरी गोवन्सच्या वीरेश बोरकर या आमदारांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन गोंधळ घातला.