मणिपूरमध्ये दोन महिलांची रस्त्यावरून विवस्त्र धिंड

0
8

>> पोलिसांकडून दोघांना अटक

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न अवस्थेत रस्त्यावरुन धिंड काढल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. ही घटना दि. 4 मे रोजी राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात घडली होती व त्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी दोघांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू, असे म्हटले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेत गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी तुम्ही काय पावले उचलली आहेत, असा सवाल केंद्र आणि मणिपूर सरकारला केला आहे. व्हिडिओ पाहून आम्ही खूप अस्वस्थ झालो आहोत. आम्ही सरकारला यावर पावले उचलण्यासाठी वेळ देत आहोत. त्यांनी काही केले नाही तर आम्हाला पावले उचलावी लागतील असे म्हटले आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. पंतप्रधानमोदी यांनी, या घटनेने 140 कोटी भारतीयांची मान खाली गेली आहे. मणिपूरची घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. या प्रकरणातील गुन्हेगाराला सोडले जाणार नाही अशी हमी दिली आहे. मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे.