भारताची सर्वोत्तम स्थानावरील महिला खेळाडू मणिका बत्रा हिच्या नावाची मंगळवारी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाने भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी बत्राचे नाव काल पाठवले. मागील वर्षीदेखील बत्राचे नाव पाठवण्यात आले होते. परंतु, तिला पुरस्कार लाभला नव्हता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकलेली मणिका ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे.
२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके जिंकली होती. गोल्ड कोस्ट येथे २४ वर्षीय मणिकाच्या नेतृत्वाखाली भारताने आपले पहिलेच महिला सांघिक सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर पाचच महिन्यांनी मणिकाने अचंथा शरथ कमल याच्या साथीने जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. सध्या जागतिक क्रमवारीत ६३व्या स्थानावर असलेल्या मणिकाने मार्च २०१९ मध्ये आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम ४६वे स्थान मिळविले होते. २०२० आयटीटीएफ विश्व सांघिक पात्रता स्पर्धेत तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रभावी कामगिरी केली होती.
तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जवळपास जाणारा दुसरा कोणताही खेळाडू नव्हता. तिच्या प्रभावी कामगिरीमुळेच तिची शिफारस करण्यात आल्याचे महासंघाचे सरचिटणीस एमपी सिंग यांनी सांगितले. महासंघाने मधुरिका पाटकर, मानव ठक्कर व सुतिर्था मुखर्जी यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठवली आहेत. मुखर्जीने नुकतेच महिला एकेरीच्या ‘टॉप १००’मध्ये प्रवेश केला होता. द्रोणाचार्य पुरस्कारासाठी प्रशिक्षक जयंता पुशीलाल व एस. रमण यांची नावे देण्यात आली आहेत.
दुसरीकडे प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी टेबल टेनिस खेळाडूंनी सलग दुसर्यांदा नकार दिला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला शिबिरात सहभागी होण्याची विनंती खेळाडूंनी धुडकावल्यानंतर महासंघाने जूनच्या शेवटच्या आठवड्याचा पर्याय खेळाडूंना दिला होता. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे खेळाडूंनी प्रवास करण्यास असमर्थता दर्शवत आपली अनुुपलब्धता कळवली आहे.