दक्षिण गोव्यातील जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी सरकारने मडगाव येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत कृषी खात्याचे जिल्हा कार्यालय उघडले असून आज दि. १६ रोजी सकाळी ११ वा. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. कृषी खात्याच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दक्षिण गोव्यातील लोकांना राजधानी पणजी शहरात यावे लागत होते. सांगे, केपे, काणकोण या भागातील शेतकर्यांना त्याचा बराच त्रास होत होता. त्यामुळे त्या भागातील लोक प्रतिनिधींनी मडगाव शहरात कार्यालय उघडण्याची मागणी केली होती. गेल्या अर्थसंकल्पाच्यावेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कृषी कार्यालय स्थापन करून शेतकर्यांची गैरसोय दूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले. सांगे, केपे व काणकोण व सासष्टी भागातील शेतकर्यांचे शेती उत्पादनात अधिक योगदान आहे. सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.