अविश्वासाच्या ठरावाला सामोरे न जाता मडगावचे नगराध्यक्ष घन:श्याम शिरोडकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा पालिका प्रशासन संचालकांकडे सादर केला. मडगाव नगराध्यक्षांविरुद्ध दाखल अविश्वासाच्या ठरावावर चर्चा करण्यासाठी शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली होती; मात्र त्यापूर्वीच घन:श्याम शिरोडकर यांनी राजीनामा दिला. नगराध्यक्षपदाच्या खुर्चीसाठीच्या राजकारणामुळे एका आठवड्यात पद सोडण्याची पाळी घन:श्याम शिरोडकर यांच्यावर आली.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी घन:श्याम शिरोडकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांच्या विरोधात उभे राहिलेले मडगाव मॉडेलचे दामोदर शिरोडकर यांचा १५-१० मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर सोमवारी मडगाव मॉडेल व भाजपच्या १५ नगरसेवकांनी अविश्वासाच्या ठरावाची नोटीस दिली होती. त्यावर शुक्रवारी चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच शिरोडकर यांनी राजीनामा दिला.
निवडणुकीत आपणास मतदान केलेल्या नगरसेवकांना धर्मसंकटात टाकायचे नाही. त्यासाठी आपण राजीनामा देत आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत गुप्त मतदान, तर अविश्वाच्या ठरावावर हात दाखवून मतदान करणे ही पद्धत योग्य नाही. ही पद्धत बंद करण्यासाठी आपण न्यायालयात जाणार आहे. गुप्त मतदान झाले असते, तर आपणास २० मते पडली असती, असे घन:श्याम शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
आपण नगराध्यक्षपदी शुक्रवारी दुपारी १ वाजता निवडून आलो व त्याच दिवशी दोन तासानंतर पणजी येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात १५ जणांनी अविश्वासाच्या ठरावावर सह्या केल्या, असे आपणास समजले. लोकशाही पद्धतीने निवडून आल्यानंतर अविश्वासाचा ठराव आणणे चुकीचे आहे. गेली २८ वर्षे दिगंबर कामत मडगावचे आमदार आहेत. त्यांनी नगरसेवकांना देवळात नेणे योग्य नव्हते. यापूर्वीच देखील नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल झाले होते; पण असले गलिच्छ राजकारण झाले नव्हते, असेही शिरोडकर म्हणाले.