>> खातेधारकांना ६ महिन्यांत काढता येणार ५ हजार
मडगाव अर्बन सहकारी बँकेला आर्थिक परिस्थिती सुधारण्यास संधी देऊनही अपयश आल्याने रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी कडक निर्बंध लादले असून खातेधारकांना सहा महिन्यांत एकदाच पाच हजार रुपये काढण्यास परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशामुळे हजारो खातेदारांमध्ये खळबळ माजली असून व्यापारी वर्गावर मोठे संकट कोसळले आहे.
बँकेच्या संचालक मंडळाला डबघाईस गेलेल्या बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास संधी देण्यात आली होती. मात्र, त्यात सुधारणा न झाल्याने बँकेच्या आर्थिक व्यवहारावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. बँक तोट्यात असून कर्जवसुली करण्यास अपयश आले आहे. कायम ठेवी ठेवण्यास बंदी, कायम ठेवींची मुदत संपल्यास नूतनीकरणास परवानगी देण्यात आली आहे. या अटी सहा महिन्यांसाठी असून त्यानंतर बँकेच्या व्यवहाराची तपासणी करूनच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने आदेशात म्हटले आहे.
काल रिझर्व्ह बँकेचा आदेश पोहोचताच खातेधारकांमध्ये खळबळ माजली. असंख्य छोट्या व्यापार्यांची खाती या बँकेत असून ते दैनंदिन व्यवहार करीत असतात. शिवाय सर्वसामान्य लोकांनी मुलांचे शिक्षण तसेच लग्न कार्यासाठी बँकेत पैसे ठेवलेले असून ते काढण्यास बंदी घातल्याने खातेधारकांची भीतीने गाळण उडाली आहे.
गेल्या सर्वसाधारण सभेत खातेधारकांनी बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर आवाज उठवला होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून रिझर्व्ह बँकेने या बँकेची आर्थिक स्थिती सुधारून रुळावर आणण्यासाठी मुदत दिली होती. पण कर्जाची थकबाकी वसुली करण्यास अपयश, संचालक मंडळाची अकार्यक्षमता बँक आर्थिक डबघाईस येण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे.
खातेधारकांचे पैसे सुरक्षित
बँकेचे व्यवस्थापक किशोर आमोणकर यांनी सांगितले की, खातेधारकांचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत. पण रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने काही करू शकत नाही. ही बँक पीएमजी बँकेत विलीन करण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये ठराव घेतला होता व प्रक्रिया चालू आहे. सरकारच्या मंजुरीला विलंब झाला. आता पुन्हा प्रयत्न चालू असून सहा महिने ते वर्षभरात विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल.