मडगावात सुरा खुपसून एकाचा खून

0
189

 

दवर्ली येथे गुरुवारी रात्री पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणाला हिंसक वळण लागल्यानंतर मुजाहिद खानजाडे (२२) या तरुणाचा पोटात सुरा खुपसून खून करण्यात आला. याप्रकरणी दवर्ली येथील इस्माईल मुल्ला उर्फ छोटू (२३) व सादीक बेल्लारी उर्फ लोली (२०) या दोघांना मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केली अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.

इस्माईल मुल्ला हा फरशी बसविणारा कामगार व सादीक हशा मजूर आहे. ते दवर्ली येथे राहतात, तर मयत चंद्रवाडो फातोर्डा येथे राहत होता. मयत पेट्रोल मॅकनिक होता.

गुरुवारी रात्री अकरा वाजता भगवती कॉलनी दवर्ली येथे महमद जावेद अस्लाबक्ष पानवाले (२२) हा भाजी विक्रेता दवर्ली येथे खुल्या जागेत बसला होता. त्यावेळी मुजाहीद त्याच्याकडे गेला व दोघे गप्पा गोष्टी करू लागले. इतक्यात सादीक बेल्लारी मोटरसायकल घेवून तेथे आला. महमद जावदेकडे जावून त्याने भांडण सुरू केले. त्यावेळी रागाच्या भरात महमदने सादीक याच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार केला. तर इस्मायल याने मुझाहिद खान याच्या पोटात सुरा खुपसून गंभीर जखमी केले. तसेच खिडक्यांची तावदाने काढून त्याची वाहने फोडली. सादीक याचा भाऊ महमद याने जखमी मुझाहिद खान याला हॉस्पिसियु इस्पितळात उपचारासाठी नेले. सादीक बेल्लारीही जखमी झाला होता. त्याला उपचारानंतर घरी पाठविले. खून प्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडीत पाठविले. उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सागर एकोसकर यांनी कारवाई केली.