मडगावात बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

0
3

>> स्थानिकांना पाहून संशयितांचे पलायन

काल बुधवारी सकाळी आके मडगाव येथे एका व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. मात्र स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. बंदुकीचा धाक दाखवत हा अपहरणाचा प्रयत्न झाला. मडगाव शहराचे प्रमुख केंद्र असलेल्या आके येथील पांडवा चॅपेल परिसरात काल बुधवारी सकाळी 3 अज्ञात इसमांनी मडगाव येथील सोन्याचे व्यापारी कुणाल रायकर यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. काल सकाळी 7.45 वा. ही घटना घडली. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेमुळे हे अपहरण फसले. रायकर हे ते सोन्याचे व्यापारी असले तरी हे अपहरण प्रकरण त्यातून की जमिनीच्या प्रकरणातून घडले अशा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

कुणाल रायकर हे बुधवारी सकाळी आके येथे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आले होते. मुलाला शाळेत सोडून परत गाडीकडे जात असता तिघा अज्ञातांनी त्यांना अडविले व बंदुकीचा धाक दाखवत रायकर यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तेथे असलेल्या स्थानिकांनी घटना पाहताच गर्दी केल्याने अपहरणकर्त्या तिघांनीही तेथून पळ काढला व रायकर यांची सुटका झाली. स्थानिक धावून आल्याने पळ काढताना संशयितांच्या हातांत असलेल्या बंदुकीच्या गोळ्याची मॅगझिन सुटून खाली पडले.

पोलिसांना याबाबतची खबर देताच मडगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी गोळ्याचे मॅगझिन ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी याबाबत माहिती देताना तिन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, आके-मडगाव येथील दिवसाढवळ्या लोकांना बंदुकीच्या धाकाने धमकावण्याच्या घटनेने गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती कमी झाल्याचे सिद्ध झाले आहे. गोव्यात भाजप सरकारचे गुन्हे व गुन्हेगारांवर नियंत्रण नसून भाजपने गोव्याला गुंडाराज बनवल्याचा आरोप केला.