>> वैद्यकीय सुविधांची आज करणार पाहणी
दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळात येत्या शनिवारी १९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार्या तिसर्या कोविड इस्पितळात सुरुवातीला १५० खाटांची सोय केली जाणार असून टप्पाटप्प्याने खाटांची संख्या ३५० पर्यत वाढविली जाणार आहे. या इस्पितळातील रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या वैद्यकीय साधनसुविधांची पहाणी आज शुक्रवार दि. १८ रोजी केली जाणार आहे. सरकारी इस्पितळात कोविडसाठी गरजू रूग्णांना खाटांची सोय, व्हीआयपी कल्चरला स्थान नाही, अशी माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
आरोग्यमंत्री राणे यांनी राज्यातील कोविड तज्ज्ञ समितीबरोबर बैठक घेऊन कोविड उपचारांबाबत काल सविस्तर चर्चा केली. गोमेकॉच्या वॉर्ड १४८ मध्ये येणार्या कोरोनाबाधित गंभीर आजारी रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी इस्पितळातील भूलतंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी खास एसओपी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांसाठी गोमेकॉतील आणखी एक वॉर्ड क्र. ११५ येत्या मंगळवारपर्यंत तयार होणार आहे. सरकारी इस्पितळात गरजू रुग्णांना खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. नो व्हीआयपी कल्चर, असाही निर्णय घेण्यात आला आहे. होम आयसोलेशन रुग्णांना देण्यात आलेल्या कीटमधील वैद्यकीय वस्तूंमध्ये थोडा बदल करण्यात आला असून उत्तर प्रदेश सरकारच्या प्रॉटोकॉलनुसार होम कीटचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.