करंजाळ-मडकई येथील अवर लेडी ऑफ फातिमा चॅपेलच्या जवळील दफनभूमीतील जवळपास १०-१२ क्रॉसची अज्ञाताने मोडतोड केल्याचे काल सकाळी उघडकीस आले. सदर दफनभूमी मुख्य रस्त्यापासून अवघ्या २०-२५ मिटर अंतरावर असून मुसळधार पावसावेळी अज्ञातांनी दोन-तीन दिवसांपूर्वी हे भ्याड कृत्य केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडचडे पोलिसांनी राज्यातील विविध भागात क्रॉसची मोडतोड करणार्या फ्रान्सिस परेरा याला अटक कल्यानंतर करंजाळ येथील चॅपेल समितीच्या पदाधिकार्यांनी चार दिवसांपूर्वी दफनभूमीत जाऊन पाहणी केली होती. परंतु काल सकाळी मडकईतील एक व्यक्ती दफनभूमीत गेल्यानंतर त्याला क्रॉसची मोडतोड केल्याचे दृष्टीस पडले. सदर माहिती गावातील लोकांना कळताच संध्याकाळी ४ वा. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. दफनभूमीच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट अज्ञातांनी तोडली आहे. तसेच दफनभूमीत असलेले १०-१२ क्रॉसची मोडतोड करण्याबरोबर काही हाडेही इतस्तत: फेकली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अरूण बाक्रे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर निरीक्षक सुदेश नाईक यांनी भेट देऊन स्थितीची पाहणी केली. फातिमा चॅपेलचे ऍटर्नी इराज्मो आगियार यांनी अधिक माहिती देताना कुडचडे पोलिसांनी संशयित फ्रान्सिस परेरा याला अटक केल्यानंतर समितीची बैठक होऊन चार दिवसांपूर्वी स्मशानभूमीची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी स्मशानभूमीत कोणतेही गैरप्रकार झाल्याचे आढळून आले नव्हते. परंतु काल सकाळी क्रॉसची मोडतोड झाल्याने सदर प्रकार दोन ते तीन दिवसांपूर्वी घडला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.