लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काल हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे.
या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्यांना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केल्या आहेत. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने गाइडलाइन्स जारी केली आहे. त्यानुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नोडल प्राधिकरणाची स्थापना करतील. ज्यांना जाण्याची इच्छा आहे त्यांची स्क्रीनिंग केली जाईल. मात्र त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत तर त्यांना जाण्याची परवानगी दिली जाईल. अडकलेल्या लोकांच्या प्रवासासाठी बसेस वापरल्या जाऊ शकतात. मात्र त्या बसेसना कोणतेच राज्य रोखू शकणार नाही. स्थानिक आरोग्य अधिकार्यांमार्फत या लोकांची त्या त्या स्थानी तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागेल. तसेच त्यांना आरोग्य सेतू ऍप वापरावे लागेल.
मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मजूर वर्ग, पर्यटक, विद्यार्थी, भाविक यांना आंतरराज्य वाहतूक करण्यास मान्यता देणार्या आदेशाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत केले आहे. देशातील विविध भागात अडकून पडलेल्या गोमंतकीय नागरिकांना परत आणण्यासाठी खास संकेतस्थळ (पोर्टल) तयार केले जाणार असून या संकेत स्थळांवर नोंदणी करणार्या गोमंतकीयांना आणण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल दिली.