मजुरांच्या बचावासाठी डोंगरावर ड्रिलिंग सुरू

0
29

>> सिल्क्यारा बोगद्याकडे लष्कराची अभियंता तुकडी दाखल

उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी शुक्रवारपासून (24 नोव्हेंबर) थांबवलेले बचावकार्य काल रविवारी पुन्हा सुरू झाले आहे. आता कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगराच्या माथ्यावरून उभ्या खोदकाम केले जात आहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री रविवारी दुपारीच डोंगराच्या माथ्यावर पोहोचली असून 15 मीटरपेक्षा जास्त खोदकाम करण्यात आले आहे. कोणताही अडथळा न आल्यास आम्ही 100 तासांत कामगारांपर्यंत पोहोचू, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लष्कराची ङ्गमद्रास सॅपर्सफ ही अभियंता तुकडीही घटनास्थळी दाखल झाली.

दरम्यान, आज बोगद्यात फोन लँडलाइनही टाकण्यात येणार असून त्यामुळे कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलता येणार आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचू न शकल्याने प्लॅन बीनुसार व्हर्टिकल ड्रिलिंगचे नियोजन करण्यात आले.
बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकन ऑगर मशीन वापरून रेस्क्यू पाईप्स खोदले जात होते आणि टाकले जात होते. शुक्रवारी मशिनचे ब्लेड कामगारांच्या जागेच्या अवघ्या 10 मीटर आधी तुटले. त्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले. यानंतर काल रविवारपासून पुन्हा बचावकार्य सुरू केले आहे.

गेल्या 21 नोव्हेंबरपासून सिल्कियारा बाजूकडून बोगद्यात आडवे खोदण्याचे काम सुरू होते. ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. 60 मीटर भागापैकी 47 मीटर पाईप ड्रिलिंगद्वारे टाकण्यात आले आहेत. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 10-12 मीटर अंतर बाकी होते, मात्र शुक्रवारी सायंकाळी ड्रिलिंग मशिनसमोरील रॉड आल्याने ड्रिलिंग मशीनचा शाफ्ट अडकला व मशिनमधून जास्त दाब आल्यावर ते तुटले. त्याचा काही भाग तोडून काढण्यात आला, मात्र मोठा भाग अजूनही तिथेच अडकून पडला आहे. ते मॅन्युअल ड्रिलिंगद्वारे काढले जाईल, त्यानंतर पुढील उत्खनन केले जाईल.

अनेक अडथळे
कामगारांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न सुरू असूनही बचाव व मदत कार्यात अनेक अडथळे उभे राहत आहेत. बोगद्यात कोसळलेल्या ढिगाऱ्यात अमेरिकी ऑगर हे यंत्र अडकून बसल्याने नवे आव्हान उभे राहिले. ढिगाऱ्यात अडकलेले अमेरिकी यंत्र पूर्णपणे मोकळे केल्याशिवाय हे काम पुढे सरकणार नाही. हा बांधकाम सुरू असलेला बोगदा 12 नोव्हेंबरला कोसळून 41 कामगार आत अडकले आहेत.