मजुरांचा जीव वाचवण्यासाठी आता ‘रॅट मायनिंग’चा आधार

0
21

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यारामधील निर्माणाधीन बोगद्यात मागील 16 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मजुरांच्या सुटकेसाठी 80 मीटर व्यास असलेला 10 मीटर पाईप टाकण्याचे काम मागील चार दिवसांपासून थांबले आहे. अवजड मशिन्स निकामी झाल्यानंतर आता 41 मजुरांना वाचवण्यासाठी रॅट मायनिंग करणाऱ्या खाण कामगारांनाना पाचारण करण्यात आले आहे.

रॅट मायनिंग म्हणजे नेमके काय, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यांच्या नावातील उंदीर या शब्दावरून हे समजू शकते की उंदरांप्रमाणेच. एका छोट्या जागेत वेगाने खोदणारी तज्ज्ञांची टीम. या टीमवर आता 41 मजुरांची सुटका अवलंबून आहे. हे खाण कामगार हाताने 48 मीटरच्या पुढे खोदकाम करतील. यासाठी त्यांच्याकडे हातोडा, फावडा आणि इतर पारंपारिक खोदकामाची साधने असतील. दिल्ली आणि अहमदाबादमध्ये या प्रकारच्या कामाचा अनुभव असलेल्या 6 खाण कामगारांची टीम येथे पोहोचली आहे.

दोन-दोन खाण कामगारांवर जबाबदारी
रॅट मायनिंग कामगारांनी सांगितले की, पहिल्यांदा दोघे जण पाईपलाईनमध्ये जातील, एक पुढे मार्ग तयार करेल आणि दुसरा खोदलेली माती व दगड एका ट्रॉलीमध्ये भरेल. बाहेर उभे असलेले चार लोक दोरीच्या साहाय्याने दगड-माती ट्रॉली पाईपच्या आतून बाहेर काढतील. एका वेळी 6 ते 7 किलो दगडमाती बाहेर काढली जाईल. खोदकाम करण्यासाठी आत गेलेले दोघे जण थकले की बाहेरून दोघे जण आत जातील आणि आधीचे दोघेही बाहेर येतील. तसेच उर्वरित 10 मीटरसाठी एक-एक करून खोदकाम केले जाणार आहे. आत अडकलेली माणसेही कामगार आहेत आणि आम्हीही कामगार आहोत. त्यांना वाचवले, तर उद्या आम्ही कुठेतरी अडकलो तर हेच लोक आम्हाला वाचवतील, अशी आशा या कामगारांनी व्यक्त केली.

लहान जागी खोदकामाचा अनुभव
रॅट मायनिंग कामगार हे लहान जागेत खोदकाम करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. ज्या ठिकामी मशीनचे काम शक्य नाही, तेथे हे कामगार उपयुक्त आहेत. साधारणपणे या तंत्राचा वापर बेकायदेशीर कोळसा खाणकामासाठी केला जातो. मशीन आणि इतर उपकरणांची उपस्थिती लोकांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेऊ शकते. प्रशासनाला रॅट मायनिंगबाबत कोणताही सुगावा लागत नाही. याशिवाय, ही एक अतिशय वेगवान प्रक्रिया आहे आणि तिचे यश अपेक्षित आहे. त्यामुळे हे तंत्र आशेचा किरण बनले आहे.