>> भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न
यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, याची आम्हाला खात्री व विश्वास आहे, तरीही भाजपविरोधी पक्षांनी एकत्रित यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मगो पक्ष कॉंग्रेसबरोबर राहील, याची आम्हाला खात्री आहे, असे कॉंग्रेस नेते मायकल लोबो यांनी काल सांगितले. अन्य छोटे मोठे पक्ष व अपक्ष उमेदवारही आमच्या पाठिशी राहावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोवा फॉरवर्डबरोबर तर आमची निवडणूकपूर्व युती झालेली आहे, असेही ते म्हणाले.
१० मार्च रोजी राज्यात मतमोजणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काल कॉंग्रेसने पणजीत आपले उमेदवार व त्यांचे निवडणूक एजंट यांची बैठक घेऊन त्यांना मतमोजणीविषयी काही महत्त्वाच्या सूचना करण्याबरोबरच मार्गदर्शनही केले.
मतमोजणी कोणत्याही त्रुटीशिवाय योग्य प्रकारे होते आहे की नाही याकडे बारीक लक्ष ठेवावे, अशी सूचना करतानाच सत्तास्थापनेसाठी कोणते प्रयत्न करावेत व कोणती पावले उचलावीत, यासंबंधीचे मार्गदर्शनही यावेळी पक्षाचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् आणि गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी बैठकीत केले. दरम्यान, दक्षिण गोव्यातील उमेदवारांची बैठक मडगाव येथे होणार आहे.