महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगोप) म्हादई बचाव आंदोलनाला सत्तरी तालुक्यातील साट्रे भागातून काल प्रारंभ करण्यात आला.
या म्हादई बचाव आंदोलनानिमित्त म्हादईचे पूजन करण्यात आले. या म्हादई बचाव आंदोलनाच्या माध्यमातून गावा गावातून जनजागृती केली जाणार आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री तथा मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी आमदार नरेश सावळ, मगोपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतरांची उपस्थिती होती.
जानेवारी महिन्यात म्हादईच्या संगमावर आणखीन दोन ठिकाणी म्हादई जनजागृती कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून म्हादई बचाव आंदोलन आणखीन तीव्र करण्याची गरज आहे. सर्व लोकांनी म्हादईचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री ढवळीकर यांनी केले.
म्हादई ही आमची जीवनदायिनी आहे. म्हादईचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. म्हादईचे पाणी वळविल्यास मांडवी नदी, पर्यावरणावर विपरीत परिमाण होणार आहे. ओपा पाणी प्रकल्पाला पाणी मिळणे कठीण बनणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले. यावेळी दीपक ढवळीकर, नरेश सावळ यांनी विचार मांडले.