>> बाबू आजगावकरांचा कार्यकर्त्यांसह मगोत प्रवेश
मगो हा प्रादेशिक पक्षच गोव्याचे हीत जपू शकतो. कॉंग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी गोव्यासाठी काहीही केलेले नाही आणि म्हणूनच आपण मगो पक्षात प्रवेश केल्याचे कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले. काल मगो पक्षात प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत श्री आजगावकर बोलत होते.
काल श्री. आजगावकर आणि गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विनोद ऊर्फ बाळू फडके यांनी मगो पक्षात रितसर प्रवेश केला. यावेळी बोलताना श्री. आजगावकर म्हणाले की, गोव्याचे हीत मगो पक्षच जपणार असल्याचे दिसून आल्याने आपण मगोत प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षाने पेडणे मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्याने पक्ष सोडला का असे पत्रकारांनी आजगावकर यांना विचारले असता आजगावकर यांनी नाही असे उत्तर देत उलट पेडण्यातून कॉंग्रेसने उमेदवारी देण्याची तयारी केली होती असे सांगितले. भाजपने कुळ मुंडकार कायद्यात दुरूस्ती करून त्यांना न्यायालयाच्या पायर्या चढण्यास भाग पाडल्याचा आरोपही यावेळी श्री. आजगावकर यांनी केला.
मगो पक्ष सत्तेवर आल्यानंतर आम्ही कुळ मुंडकार कायद्यात भाजपने केलेली दुरूस्ती रद्द करणार असल्याचे आजगावकर यावेळी म्हणाले. खाण घोटाळा केलेल्यांकडून भाजप एक पैसाही वसूल करू शकला नाही असे ते म्हणाले. मगोचे नेते सुदिन ढवळीकर यावेळी बोलताना म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष आमचे आमदार फोडून नेत होते. मात्र आता आम्हांला आमची ताकद कळून चुकली आहे. पुढील सरकार हे मगोचेच असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, आमच्या कुबड्या घेऊन सरकार चालवणार्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आज वेळ आलेली आहे.
दरम्यान, गोवा सुरक्षा मंचशी तुम्ही युती करणार का असे पत्रकारांनी विचारले असता त्याचे थेट उत्तर न देता आमच्याशी युती करण्याची बरीचजणांची इच्छा असल्याचे ढवळीकर यांनी बोलून दाखवले. श्री. आजगावकर यांच्याबरोबर काल मोठ्या संख्येने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही मगो पक्षात प्रवेश केला.