पार्सेकर सरकारातून मगोच्या दोन्ही मंत्र्यांना वगळून भाजपचेच मंत्री करण्याच्या हालचालीना वेग आला असून त्यामुळे मगो पक्षात चलबिचल सुरू झाली आहे.येत्या दोन महिन्यांत यासंबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेवर येण्यासाठी भाजपने मगोबरोबर युती केली होती. त्यामुळे भाजपला प्रथमच चांगले यश आले. ही युती पाच वर्षांपर्यंत असेल, असे भाजप तसेच मगो नेतेही सांगत होते. दरम्यानच्या काळात देशातील राजकारण बदलल्याने प्रत्येक राज्यात आपल्याच पक्षाचे सरकार असावे, असा विचार निघाला त्यातूनच मगोकडून मंत्रीपदे काढून घेण्याचा विचार पुढे आला आहे.
पार्सेकर मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांच्याकडील महत्त्वाची खाती काढल्याने पक्षात नाराजी निर्माण झाली होती. वरील वृत्ताने मगो समर्थकामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. प्रियोळ मतदारसंघ राखीव होण्याची शक्यता असल्याने दीपक ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. मडकई मतदारसंघही राखीव ठेवण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे कळते.