भाजपने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर मगोने सरकार स्थापनेसाठी लगेचच बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता; मात्र आता मगोचा पाठिंबा घेण्यास विरोध वाढत आहे. सुरुवातीला काही भाजप आमदारांनी विरोध दर्शवल्यानंतर फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघातील भाजप मंडळांनी मगोचा पाठिंबा नको, असा सूर आळवला आहे. मगोला कोणत्याही स्थितीत सत्तेत सहभागी करू नका, अशी जोरदार मागणी फोंडा, शिरोडा, मडकई व प्रियोळ या चारही मतदारसंघांतील भाजपच्या मंडळ पदाधिकार्यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
फोंड्यातील या पत्रकार परिषदेला चारही भाजप मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.
या निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाडण्यासाठी मगोने मोठे षड्यंत्र रचले. फोंडा, शिरोडा, प्रियोळ या मतदारसंघात भाजप उमेदवारांच्या विजयात खोडा घातला, अशा विश्वासघातकी सुदिन ढवळीकर यांना सत्तेत सामावून घेऊ नये, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली.
फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक, प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे व शिरोड्याचे सुभाष शिरोडकर यांनी सुदिन ढवळीकर यांच्या पाठिंब्याला विरोध केला आहे. मगोचा पाठिंबा न घेता या आमदारांचे मत विचारात घ्यावे, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली.