मगोच्या कोलांटउड्या

0
40

भारतीय जनता पक्षाशी युती करणे म्हणजे आत्महत्याच ठरेल’ असे कालपरवापर्यंत उच्चरवाने सांगत आलेले आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होण्याच्या तयारीत असलेले मगो पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी एकाएकी यू टर्न घेतला आणि भाजप १२ जागा सोडणार असेल तर आम्ही तयार आहोत असे जाहीर केले. पण तोंडातून निघालेली वाफ विरते न विरते तोच ‘आम्हाला भाजपशी युती करायची नाही यावर आम्ही ठाम आहोत. आमच्या पक्षाचे काम असलेल्या १२ मतदारसंघांत आमच्यासाठी काम करायला जो तयार असेल, त्या पक्षासोबत जाऊ’ असे घुमजाव ढवळीकरांनी काल केले. मगोची गत सध्या इकडे जाऊ की तिकडे जाऊ अशी संभ्रमित दिसते, कारण आगामी निवडणुकीनंतर सत्तेवर कोण येईल त्याचा अंदाज बांधणे सध्याच्या राजकीय बजबजपुरीत त्यांनाही अवघड बनलेले आहे. विरोधक एकत्र येऊन भाजपशी लढणार की नाहीत हेच अजून ठरत नसल्याने मगोचेही ठरत नसावे! काहीही करून मगो पक्षाला सत्तेत यायचे आहे. त्यामुळेच अद्यापही तो कुंपणावर राहून कधी इकडे, तर कधी तिकडे उडी मारण्याच्या शक्यता आजमावताना दिसतो. त्यामुळे कधी मुंबईत फडणविसांशी चर्चा करा, कधी ‘आप’ च्या केजरीवालांना जाऊन भेटा, कधी ममतांच्या प्रादेशिक पक्षांच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्या असा सगळा गोंधळ चालला आहे.
भाजप आणि मगो यांचे नाते ‘तुझे माझे जमेना, पण तुझ्यावाचून करमेना’ असे आहे हे आम्ही यापूर्वी वारंवार सांगितलेच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या गोवा भेटीच्या तोंडावर, भाजपशी युतीला तयार असल्याचे सुचवत मगो नेतृत्वाने खरे तर आजकालच्या राजकारणाचा स्थायीभाव बनलेल्या संधिसाधू विकाऊ वृत्तीचेच प्रत्यंतर पुन्हा एकवार आणून दिले. परंतु केंद्रात आणि राज्यात भक्कम सरकार असलेला भाजपा मगोच्या सौदेबाजीला बळी पडायला यावेळी मुळीच तयार नाही. त्यामुळे ढवळीकरांच्या ह्या विधानानंतरही भाजपाने त्यांना थंडा प्रतिसाद दिल्याने त्यांना नामुष्की टाळण्यासाठी सारवासारव करणे भाग पडले असे दिसते. भाजपा १२ जागा मगो पक्षासाठी सोडत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत असे म्हणणार्‍या ढवळीकरांना पुरेपूर ठाऊक आहे की भाजपा एवढ्या जागा आपल्या पक्षासाठी सोडणे कदापि शक्य नाही. परंतु गोव्यात जसे ‘वाणपण’ करायचे असेल तर सुरवातीलाच चढी बोली लावली लावली जाते, तशातलाच हा एकूण प्रकार त्यांनी चालवला आहे. बारा जागा मागितल्या की सरतेशेवटी सध्या विरोधी पक्षांच्या राज्यातील भरमारीमुळे पेचात सापडलेला भाजप आपला चारच जागा देण्याचा पवित्रा सोडून सहा – सात जागा तरी मगोसाठी सोडील अशी आशा त्यांना वाटत असावी.
मगोच्या ह्या संभ्रमित स्थितीमध्ये काही प्रश्न येथे निश्‍चित उपस्थित होतात. भाजपाशी युती करण्याची तयारी दर्शवीत मगोला ‘आत्महत्या’ करण्यास असे एकाएकी काय कारण झाले? राज्यात अवतरलेल्या तृणमूलने प्रादेशिक पक्षांशी युतीचा घाट जरी घातलेला असला, तरी प्रत्यक्षात विरोधकांच्या एकत्रीकरणाच्या ह्या प्रयत्नांना कॉंग्रेसने आजवर ठेंगाच दाखवलेला असल्याने मगोने भाजपला ही सूचक नेत्रपल्लवी केली आहे. ज्या प्रमोद सावंत सरकारने आपला पक्ष फोडला आणि सरकारमधून अक्षरशः लाथा घालून बाहेर काढले, स्वार्थी म्हणून संबोधले त्याच पक्षाच्या आणि नेत्याच्या नेतृत्वाखाली सत्ता उपभोगण्यास मगो तयार आहे का, हा दुसरा प्रश्न. सावंतांकडून साबांखा आणि वाहतूक खात्याची बक्षिसी मिळत असेल तर सारे अपमान गिळण्याची मगोची तयारी आहे की काय? मगोने आपले कुंपणावरचे विकाऊ धोरण सोडावे आणि तुम्ही नेमके कोणाबरोबर आहात हे जनतेला एकदाचे सांगावेच.
ज्या आम आदमी पक्षाशी युतीचा प्रयत्न मगोने केला किंवा प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याचा जो प्रयत्न ममता बॅनर्जींनी चालवलेला आहे, त्यात सामील होण्याची तयारी दर्शवली, त्याच पक्षांना उद्देशून ढवळीकर आता ते पक्ष राज्यातील राजकीय वातावरण गढूळ करायला आले आहेत असे म्हणत आहेत. मग ह्या गढूळ पाण्यात तुम्ही का शिरायला बघत होता? आजचा मगो हा भाऊसाहेबांचा मगो नाही. तो ढवळीकरांचा मगो आहे हेच त्या पक्षाच्या सध्याच्या एकूण वर्तनातून प्रत्ययास येते आहे. विरोधक एकजुटीने भाजपशी लढणार असतील तर मगो तेथे जाईल आणि ते घडणार नसेल तर मतविभाजनाचा फायदा मिळणार असलेल्या भाजपाची साथ घेईल. पण अशा अविश्वासार्ह पक्षाला सोबत घेणे भाजप किंवा ममतांसाठीही कितपत योग्य ठरेल याचा विचार त्यांना आता करावा लागेल!