मखमली स्वराचा अस्त

0
32

‘चिठ्ठी आयी है आयी है, चिठ्ठी आयी है’ ह्या ‘नाम’ चित्रपटातील गझलमुळे ज्यांचे नाव सर्वतोमुखी झाले, ते मखमली आवाजाचे गायक पंकज उधास यांना शेवटी वरून आलेली चिठ्ठी काही चुकवता आली नाही. तशी ती कोणालाच चुकवता येत नाही म्हणा, परंतु आपल्या दुर्धर आजाराशी प्रदीर्घ काळ झुंज घेत त्यांनी ही चिठ्ठी शेवटी स्वीकारली आणि आपल्या लाखो चाहत्यांना वयाच्या 72 व्या वर्षी कायमचा अलविदा केला. गझलसारख्या अभिजात मानल्या जाणाऱ्या आणि सदैव उच्चासनी बसण्याची प्रतिष्ठा लाभलेल्या गीतप्रकाराला हिंदी चित्रपटसृष्टीत आणून तिला सर्वांच्या मुखी अधिष्ठित करण्याचे काम जर कोणी भारतात खऱ्या अर्थाने आणि सातत्याने केले असेल, तर ते पंकज उधास यांनीच. हे नाव घरोघरी पोहोचले ते मुख्यतः हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गायिलेल्या गझलांमुळे. खरे तर त्यांचा गझलेच्या वाटेवरचा प्रवास त्यापूर्वीच सुरू झाला होता. ‘आहट’ हा त्यांचा अल्बम 1980 साली आला. पुढच्या वर्षी ‘मुकर्रर’, त्याच्या पुढच्या वर्षी ‘तरन्नुम’, त्याच्या पुढच्या वर्षी ‘मेहफिल’ असे एकामागून एक अल्बम करत असताना आणि 84 साली लंडनच्या प्रख्यात रॉयल अल्बर्ट हॉलमधील लाईव्ह शोमध्ये गझल सादर करण्याची संधी प्राप्त झाली असताना 86 साली महेश भट्ट यांनी आपल्या ‘नाम’ ह्या चित्रपटात त्यांची ‘चिठ्ठी आयी है’ ही गझल घेतली आणि हे नाव खऱ्या अर्थाने घरोघरी जाऊन पोहोचले. ‘चाँदी जैरा रंग है तेरा’, ‘दीवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है’, ‘हुई महंगी बहोत ये शराब के थोडी थोडी पिया करो’, ‘एक तरफ उसका घर, एक तरफ मयकदा’, ‘निकलो न बेनकाब, जमाना खराब है’, ‘दिल धडकने का सबब याद आया’, ‘आप जिनके करीब होते है’, ‘ना कजरेकी धार’, ‘जिये तो जिये कैसे बिन आपके’.. अशा किती गझला सांगाव्यात की ज्या ऐकत ऐकत तत्कालीन पिढीने प्रेम केले आणि विरहही सोसला. मैफलींपासून मयखान्यापर्यंत हा मखमली स्वर गुंजत राहिला. गझलवरचा पाकिस्तानी गायकांचा वरचष्माही पंकज उधास यांनी आपल्या उदंड लोकप्रियतेने मोडून काढला. जवळजवळ चाळीस वर्षांची त्यांची सांगीतिक कारकीर्द तत्कालीन हिंदी चित्रपटसृष्टीशी समांतर राहिली आहे. अनुराधा पौडवालांपासून साधना सरगम आणि लता मंगेशकरांपर्यंत अनेकांसमवेत त्यांनी अवीट गोडीच्या गझला गायिल्या, ज्या आजही तेवढ्याच आवडीने ऐकल्या जातात. खरे तर ते गुजराती कुटुंबात आणि शिक्षणाला महत्त्व असलेल्या घरात जन्माला आलेले. आजोबा गावातले पहिले पदवीधर, वडील केशुभाई सरकारी नोकरीत. स्वतः पंकज यांनाही डॉक्टर व्हायचे होते. ते स्वप्न त्यांनी स्वतः बाळगले होते. परंतु हे तिन्ही बंधू स्वतःच्या नकळत पोहोचले संगीताच्या व त्यातही गझलच्या दुनियेत. मोठे बंधू मनहर उधास हेही गझल गायक आहेत आणि दुसरे बंधू निर्मल उधास हेदेखील. स्वतः पंकज उधास यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा गाणे गायिले. त्याबद्दल त्यांना 51 रुपये बक्षीस मिळाले होते. डॉक्टर बनायला निघालेले पंकज उधास गझल गायक म्हणून देशविदेशात ख्यातनाम झाले, तरी त्यांची औषधशास्त्राबद्दलची आवड कायम होती. वैद्यक क्षेत्राचे 80 टक्के ज्ञान आपण मिळवले आहे आणि कुटुंबात कोणी आजारी असेल तर त्याचे औषधोपचारही आपण त्याच्या आधारे करत असतो असे त्याबद्दल मुंबईतील एका सायंदैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. वाहन चालवणे हाही त्यांचा छंद होता. त्यांच्या वडिलांची एक जीप होती, परंतु ते मुलांना तिला हात लावू देत नसत. त्यामुळे आपली पुरेशी कमाई होताच पंकज उधास यांनी सर्वांत आधी काय खरेदी केले असेल तर 1951 मॉडेलची एक जुनी फियाट कार. नंतरच्या काळात जसजसे अधिकाधिक यश मिळत गेले, तसतशी नवनवी वाहने त्यांच्याकडे आली, परंतु आपल्या ह्या पहिल्यावहिल्या मोटारीवर त्यांचे प्रेम होते. अनेक भारतीय गायकांनी गझला गायिल्या, परंतु नंतर ते गायक इतर गीतप्रकारांकडेही वळले. अनूप जलोटांनी तर भजनांचा मार्ग स्वीकारला. परंतु पंकज उधास यांनी मात्र ‘गझल एके गझल’ करीत, अभिजनांमध्ये आधीच लोकप्रिय असलेल्या गीतप्रकाराला बहुजनांपर्यंत पोहोचवले आणि त्यांनाही त्याचा आनंद मनमुराद लुटू दिला. जगजितसिंहपासून हरिहरनपर्यंतच्या गझल गायकांच्या गझलांवर प्रेम करणारे काही रसिक पंकज उधास यांच्या गझलांकडे मात्र दुय्यम नजरेने पाहायचे. ती ‘फिल्मी’ अधिक आहे असे म्हणून तिची उपेक्षा करायचे. आजही हा पूर्वग्रह अनेकांच्या मनात कायम असेल, परंतु तरीदेखील देशात आणि विदेशांत आपला फार मोठा चाहतावर्ग पंकज उधास यांनी सातत्यपूर्ण गझलगायनातून आणि लाईव्ह शोज्‌‍मधून निर्माण केला होता. हा चाहतावर्ग आता निश्चित पोरका झाला आहे.