मंत्री पाऊसकर खंडणीप्रकरणी मुख्य संशयिताचा शोध सुरू

0
161

येथील पणजी पोलिसांकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्याकडून तीन कोटी रुपयांची खंडणी वसुलीच्या प्रयत्न प्रकरणी मंत्री पाऊसकर यांना खंडणीसाठी फोन कॉल्स केलेल्या व्यक्तीची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

संशयिताकडून मंत्र्याला फोन कॉल करणार्‍या व्यक्तीची माहिती मिळालेली नाही. केवळ त्याचा फोन नंबर मिळालेला आहे. गोव्यातील मंत्र्याकडून दिला जाणारा ऐवज घेऊन येण्याची सूचना कॉल करणार्‍या व्यक्तीने केली. एवढीच माहिती अटक केलेल्या व्यक्तीने पोलिसांना दिली आहे.

मंत्री पाऊसकर यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रकाराची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मंत्र्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. पोलिसांनी या कथित खंडणी वसुलीप्रकरणी मुंबईतील तिघांना अटक केली आहे. प्रदीप मलिक, अमोल स्वामी आणि आर. पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मंत्री पाऊसकर यांना फोन करून खंडणी मागणार्‍यांची सखोल माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. संशयित तिघांकडून फोन करणार्‍याची माहिती मिळालेली नाही. फोन करणार्‍या व्यक्तीच्या सूचनेवरून तिघेही मंत्री पाऊसकर यांच्या आल्तिनो पणजी येथील सरकारी निवासस्थानाजवळ सोमवार दि. २० जानेवारीला आले होते. त्यावेळी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मंत्री पाऊसकर यांना एका व्यक्तीने फोन कॉल करून तीन कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली. खंडणी न दिल्यास बदनामी करण्याची इशारा दिला. सदर व्यक्तीने फोन कॉल विदेशातून केला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.