मंत्रिमंडळ समितीला तिसर्‍यांदा मुदतवाढ

0
156

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत सरकारचा कारभार हाताळण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय मंत्रिमंडळ सल्लागार समितीला काल तिसर्‍यांदा जून ३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तत्‌संबंधीचा आदेश काल जारी केला आहे. या समितीचे एक सदस्य फ्रांसिस डिसोझा यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळ समितीची मुदत ३१ मे रोजी संपणार होती. त्यामुळे ह्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या सल्लागार समितीला परत एकदा मुदतवाढ देणे क्रमप्राप्त होते.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजारी असल्याने अमेरिकेत उपचारासाठी जाण्यापूर्वी गेल्या मार्च महिन्यात त्रिसदस्यीय मंत्रिमंडळ सल्लागार समिती आपल्या गैरहजेरीत सरकारचा कारभार पाहण्यासाठी नेमली होती. सुरवातीला या समितीचा कार्यकाळ महिनाभराचा होता. त्यानंतर पर्रीकर गोव्यात न परतल्याने एप्रिल ३० पर्यंत व पुन्हा ३१ मेपर्यंत समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. १ एप्रिल रोजी मुदतवाढ देताना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ समितीचे वित्तीय अधिकार ५ कोटींवरून १० कोटींपर्यंत वाढविले होते.