राज्य मंत्रिमंडळाची बुधवारची बैठक अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आल्याने राज्यातील बरेच मंत्री लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी मंत्रालयात हजर नव्हते. मंत्रालयात उपलब्ध असलेल्या तीन – चार मंत्र्यांनी लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.
पर्वरी येथे मंत्रालयात दर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सर्व मंत्री राज्यातील लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले होते. त्यामुळे विविध भागांतील नागरिक मंत्रालयात उपस्थित राहिले होते. मात्र बरेच मंत्री अनुपस्थित असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
आपण विविध भागांतील नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेतल्याचे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. दरम्यान, भाजपने आयोजित मेगा प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर अनेक मंत्र्यांनी सहभाग घेतला.