मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाची एवढ्यात फेररचना होणार नसल्याचे सांगून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. राज्य मंत्रिमंडळाच्या फेररचनेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांबरोबरच गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ‘कभी हां, कभी ना’ अशी भूमिका घेतलेली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या फेररचनेचा विषय गाजत असून, सत्ताधारी भाजप कधी हे झाल्यानंतर, कधी ते झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असल्याचे सांगत आले आहे. 2022 साली काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस आमदारांपैकी काही जणांना मंत्रिपदाची प्रतीक्षा असून, त्यापैकी काही आमदार तर मंत्री बनण्यासाठी उतावीळ झाले आहेत. माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांचा मंत्रिमंडळातील समावेशाचा प्रश्न चर्चेत आहे. मंत्रिमंडळाची फेररचना होणार असल्याची चर्चा असली, तरी गेल्या 5-6 महिन्यांपासून मंत्रिमंडळ फेररचनेची ही गाडी अडून पडल्याने इच्छुक फुटीर आमदारांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.