>> तानावडे म्हणाले, यंदाच्या वर्षात फेरबदल होणार
नव्या वर्षात राज्य मंत्रिमंडळाची फेररचना होण्याची शक्यता काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केली. काल नववर्षाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांनी तानावडे यांना राज्य मंत्रिमंडळ फेररचनेसंबंधी विचारले तेव्हा यावर्षी ही फेररचना होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावर्षी राज्य मंत्रिमंडळाची फेररचना होईल आणि तुम्हाला या फेररचनेचे साक्षी होता येईल, असे आपणाला वाटत असल्याचे तानावडे म्हणाले.
काल तानावडे यांची माजी खासदार नरेंद्र सावईकर व माजी खासदार विनय तेंडूलकर यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत एक बैठक झाली. भाजपच्या राज्यातील सर्व मंडळांची निवडणूक 10 जानेवारी रोजी होणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्याबरोबरच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
2027 साली राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्याकडे खास लक्ष देण्यात येणार असल्याची माहितीही तानावडे यांनी यावेळी दिली.
सावंत-बोम्मई भेट
दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल कर्नाटकातील काही वरिष्ठ भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ही फक्त एक सदिच्छा भेट होती. आणि या भेटीत राजकारण व वादग्रस्त म्हादई नदी मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.