भाजप सरकार आणि मंत्रिमंडळातील सहकारी आपापली जबाबदारी योग्य रितीने पार पाडत आहेत. त्यामुळे यापुढे मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा प्रश्नच राहाणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पुन्हा एकदा सांगितले.
नाताळ सणानिमित्त आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांच्या पर्रा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे उपस्थित होते.
मंत्री लोबो यांनी मागे मंत्रिमंडळात फेरबदल करणे गरजेचे असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी त्वरित मुख्यमंत्र्यांनी बदलाची शक्यता फेटाळून लावली होती.
जिल्हा पंचायतींच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार असल्याचे आपण कधीच म्हटले नसल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले. बार्देशात पाण्याचा मुबलक साठा आहे परंतु पाणीपुरवठा करणार्या प्रणालीत वेळेचे योग्य नियोजन करून त्यानुसार पाण्याचा पुरवठा केल्यास तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सहज सोडवता येतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या समस्येवर मात करण्यासाठी येत्या काही दिवसांत बार्देशातील आमदार, मंत्री, खात्यातील अधिकार्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.