>> भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंकडून स्पष्ट; दिल्ली भेटीमुळे चर्चांना जोर
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता तूर्त कमीच आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि काही आमदारांनी नवी दिल्ली येथे धाव घेतल्याने राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर बोलताना सदानंद तानावडे यांनी सांगितले की, लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकसभेचे पहिलेच अधिवेशन असल्याने मुख्यमंत्री, काही मंत्री, आमदार नवी दिल्लीला गेले होते. त्याठिकाणी मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत अजूनपर्यंत भाजप संघटनेशी कोणतीही चर्चा केलेली नाही.
राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्यापूर्वी त्याबाबत माहिती भाजप संघटनेला दिली जाते. तथापि, मुख्यमंत्री डॉ. सावंत या विषयावर काहीच बोललेले नाही. तसेच, राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यमंत्रिमंडळात बदल होईल, असे वाटत नाही. राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तथापि, फेरबदल करण्यापूर्वी पक्ष संघटनेला निश्चित माहिती देतील, असेही त्यांनी सांगितले.
आसगाव येथील प्रदीप आगरवडेकर यांचे घर पाडण्याची घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली सुरू असून संशयितांविरोधात कारवाई केली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.
एखाद्या जमिनीवरील घर पाडण्यासाठी बळाचा, बाऊन्सरचा वापर होणे चुकीचे आहे. कायदेशीर मार्गाने ही प्रक्रिया करण्याची गरज होती. या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांनी शिक्षा झाली पाहिजे. घर पाडण्यासाठी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून योग्य कारवाई केली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.
भाजप मुख्यालय भूमिपूजन जुलैअखेरीस
भाजपच्या गोवा मुख्यालय इमारतीची पायाभरणी करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप मुख्यालय इमारतीची पायाभरणी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाणार आहे, असेही सदानंद तानावडे यांनी सांगितले.