मंत्रिमंडळात तूर्त फेरबदल नाहीच : सदानंद तानावडे

0
5

>> मुख्यमंत्र्यांच्या अचानक दिल्ली वारीमुळे फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल अचानक नवी दिल्ली येथे पुन्हा एकदा धाव घेतल्याने राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलांच्या चर्चांना उधाण आले. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट सदानंद शेट तानावडे यांनी मंत्रिमंडळात फेरबदल ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. सोबतच मंत्रिमंडळात तूर्त फेरबदलाची कोणतीही शक्यता नाही, असेही त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, काल सायंकाळी दिल्लीला रवाना झालेले मुख्यमंत्री रात्री उशिरापर्यंत गोव्यात परतले नव्हते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या बैठकीत राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीबरोबर राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल आणि राज्यसभा निवडणूक आदी विषयावर चर्चा केली होती. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, तसेच भाजपच्या केंद्रीय नेत्यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री डॉ. सावंत शनिवारी संध्याकाळी तातडीने नवी दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी चर्चा सुरू झाली. काँग्रेस पक्षातील फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ पैकी दोन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांपैकी पाच आमदारांची महामंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आमदार दिगंबर कामत, आमदार आलेक्स सिक्वेरा आणि आमदार मायकल लोबो यांच्याकडे अजूनपर्यंत कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यापैकी दोघा आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असेल, तर मुख्यमंत्री डॉ. सावंत हे स्वत:च स्पष्ट करतील. मात्र सध्या तरी मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता नाही, असे तानावडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नवी दिल्ली येथे वैयक्तिक कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली, असे स्पष्टीकरण तानावडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीबाबत दिले.

अपात्रता याचिकेतील आरोपांना उत्तरे
गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी गोवा विधानसभेचे सभापतींसमोर आमदार दिगंबर कामत आणि आमदार मायकल लोबो यांच्याविरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर काल सुनावणी झाली. यावेळी कामत आणि लोबो यांनी अपात्रता याचिकेत केलेल्या आरोपांना उत्तरे देणारी प्रतिज्ञापत्रे सादर केली. त्यानंतर अमित पाटकर यांच्या वकिलांनी दोन्ही आमदारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर युक्तिवाद केला. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 17 ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे.