मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच कला अकादमीचे नूतनीकरण

0
9

>> कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे; नीलेश काब्राल यांच्या पलटवारानंतर स्पष्टीकरण

गोवा कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम कंत्राटदाराला नामांकन तत्त्वावर देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानेच मान्यता दिली होती, असे स्पष्टीकरण कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी भाजप मंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिले.

गोवा कला अकादमीच्या ५० कोटी रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या नूतनीकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गोवा सरकारच्या दक्षता खात्याने कला अकादमीच्या नूतनीकरण प्रकरणी तीन सदस्यीय समितीकडून चौकशीची शिफारस केली आहे. यानंतर विरोधकांकडून टीका सुरुच आहे; सोबतच भाजपच्या एका प्रवक्त्यानेही गोविंद गावडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा विषय चांगलाच तापला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम नामांकन तत्त्वावर कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एक मंत्री म्हणून आपले चांगले कार्य पाहून कुणाच्या तरी पोटात दुखू लागल्याने त्यांनी आपल्यावर नाहक आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फळे लागणार्‍या झाडावर जास्त दगड मारले जातात, असेही मंत्री गावडे म्हणाले.
कला-संस्कृती खात्यानेच नामांकन तत्त्वावर टॅकटॉन बिल्डरला काम देण्याची सूचना केली होती, असा दावा गुरुवारी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी केला होता. त्याविषयीचा प्रश्‍न गोविंद गावडे यांना विचारला असता, कला अकादमी इमारत नूतनीकरण प्रकरणी नीलेश काब्राल यांनी केलेल्या वक्तव्याची व्हिडिओ फुटेज दाखवा. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर आपण प्रतिक्रिया देईन, असे गावडे यांनी सांगितले.

सी. टी. रवींकडून सावियो रॉड्रिगीस यांना समज
भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि भाजपचे प्रवक्ते सावियो रॉड्रिगीस या दोघांशीही कला अकादमी नूतनीकरणाच्या विषयाबाबत चर्चा केलीे. या प्रकरणी सावियो रॉड्रिगीस यांना समज देण्यात आली आहे, अशी माहिती सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांना दिली.

आपण दक्षता खात्याच्या अहवालानुसार भाष्य केले. ५ लाख रुपयांचे काम असेल, तर त्यांची निविदा काढावी लागते. कला अकादमीचे काम निविदा जारी न करता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला असेल, तर त्याला जेवढे कोणी जबाबदार असतील, त्या सर्वांनी उत्तर द्यायला हवे.

  • सावियो रॉड्रिगीस, प्रवक्ते, भाजप.