>> केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन
मला कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्यात यावे, असे काही जणांना वाटत होते आणि त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ते बरोबर आहे; मात्र कॅबिनेट मंत्रिपद असो अथवा राज्यमंत्रिपद त्याद्वारे जनतेची सेवा करणे हेच जास्त गरजेचे व महत्त्वाचे आहे, असे प्रांजळ मत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.
काल गोवा श्रमिक पत्रकार संघ व मराठी पत्रकार संघाने श्रीपाद नाईक यांच्याबरोबर एक वार्तालापाचा कार्यक्रम गुजच्या पाटो येथील कार्यालयात आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. तुम्हाला जे राज्यमंत्रिपद देण्यात आलेले आहे त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का, असे विचारले असता, आपणाला जे ऊर्जा राज्यमंत्रिपद देण्यात आलेले आहे, त्याबाबत आपण समाधानी असून, या मंत्रालयाच्या माध्यमातून लोकांसाठी करण्यासारखे खूप काही असल्याचे नाईक म्हणाले.
ऊर्जा व विजेशिवाय विकास शक्य नाही. गोव्यासाठी महत्त्वाचा असलेल्या तमनार वीज प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची समजूत घालून त्यांचे मन वळवणे आवश्यक आहे व गरज भासल्यास ते काम करण्यास आपण तयार असल्याचे नाईक म्हणाले. तमनारसारख्या प्रकल्पामुळे जर पर्यावरणाचे नुकसान झाले, तर ते भरून काढणे शक्य आहे, असे ते पुढे बोलताना म्हणाले. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन हे करणे शक्य असून, याबाबत आपण या आठवड्यात गोवा सरकारबरोबर एक बैठक घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. जर गरज भासली, तर वरील प्रकरणी केंद्र सरकारलाही हस्तक्षेप करण्याची सूचना करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी व्यासपीठावर श्रीपाद नाईक यांच्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार जयंत संभाजी, गुरुदास सावळ, वामन प्रभू व गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक हे उपस्थित होते.
पक्षाने जबाबदारी दिल्यास स्थानिक राजकारणात येऊ
आपण आतापर्यंत पक्षाने आपणाला दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, पक्षाने जर आपणाला स्थानिक राजकारणात पाठवले, तर ती जबाबदारीही स्वीकारणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.